Vande Bharat Express Likely To Get Shut On This Route In Maharashtra: भारतामधील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. देशातील सर्वात आधुनिक ट्रेन म्हणून वंदे भारतचं नाव घेतलं जातं. वेग आणि या ट्रेनमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमुळे आपआपल्या राज्यात वंदे भारत ट्रेन सुरु करण्यासाठी प्रत्येक राज्य रेल्वे मंत्रालयाकडे शिफारशी करताना दिसत आहेत. मध्यंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मार्गांवरील अर्धा डझनहून अधिक वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला. या अर्धा डझन ट्रेनमध्ये दुर्ग ते विशाखापट्टणम ट्रेनचाही समावेश होता. मात्र ज्या ज्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत त्या सर्वांनाच चांगला प्रतिसाद मिळतोय असं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक मार्गांवर या ट्रेन्स अगदी रिकाम्या धावत आहेत.


प्रवाशांचा प्रतिसादच नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी महाराष्ट्रासंदर्भात सांगायचं झालं तर नागपूर-सिंकदराबाद मार्गावरील वंदे भारत ट्रेनमधील 80 टक्के खुर्च्या रिकाम्याच असतात. प्रावशांची संख्या कमी असल्याने केवळ 20 टक्के क्षमतेनं ही ट्रेन धावते. नागपूर-सिंकदराबाद मार्गावर केवळ 20 टक्के प्रवासी या वंदे भारत ट्रेनला प्राधान्य देत असल्याने या ट्रेनचे अनेक डब्बे रिकामेच असतात. 22 ऑगस्ट रोजी सिंकदराबाद ते नागपूर मार्गावर धावलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण 1440 सीट होत्या. त्यापैकी तब्बल 1200 सीट रिकाम्याच होत्या. याच ट्रेनच्या 2 एक्झिक्युटीव्ह डब्ब्यांमधील 88 सीटपैकी केवळ 10 सीट रिझर्व्ह होत्या. म्हणजेच या डब्ब्यांमधील 78 सीट रिकाम्याच होत्या.


आधी डब्यांची संख्या कमी करणार


सिकंदराबाद-नागपूर वंदे भारतला अती-अल्प प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच या मार्गावरील ही ट्रेन बंद केली जाण्याची दाट शक्यता आहे. या मार्गावर 16 सप्टेंबर रोजी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आलेली. मात्र प्राथमिक स्तरावर प्रवाशांची संख्या कमीच असेल तर आधी या ट्रेनच्या डब्यांची संख्या केली जाईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या या ट्रेनला एकूण 20 डब्बे आहेत. मात्र असाच कमी प्रतिसाद राहिल्यास ही संख्या 8 पर्यंत कमी केली जाईल असं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. असं केल्यास ट्रेनमधील सीटची संख्या 500 ने कमी होईल.


...म्हणून सुरु केलेली ही वंदे भारत ट्रेन


नागपूर-सिंकदराबाद मार्गावरील वंदे भारतच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विदर्भ पट्टा हा रामगुंडम, काझीपेठ आणि सिकंदराबादशी जोडण्याचा रेल्वेचा मानस होता. व्यापार, पर्यटन आणि खासगी प्रवासासाठी या मार्गावर उत्तम प्रतिसाद मिळेल अशी रेल्वेची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली असून आता या मार्गावरील वंदे भारत ट्रेन बंद करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे समजते.