MNS Vasant More Resignation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केलाय. साहेब मला माफ करा, अशी पोस्ट लिहत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरची साद घातली. वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून राजीनामा शेअर केलाय. आपण प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदांचा राजीनामा जेत असल्याचे वसंत मोरेंनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॅशिंग, तडफदार, जनतेमध्ये वावरणारे नेते म्हणून वसंत मोरेंची ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय. पक्षाच्या स्थापनेपासून मी आपल्यासोबत आहे. आपण मला वेळोवेळी दिलेल्या जबाबदारी मी पार पाडल्या. पक्ष संघटना वाढीसाठी मी 18 वर्षे सातत्याने काम करत आहे. महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून कार्य केले. मात्र पुणे शहरातील वरिष्ठ सहकाऱ्यांकडून माझ्याविरोधात गलिच्छ राजकारण सुरु आहे. माझ्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.


भविष्यात पक्षाचे प्रतिनिधी निवडून यावेत म्हणून मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेत होतो. कार्यक्रम देत होतो. त्यांना तादक देत होतो. पण त्या पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडून कोंडी करण्यात आली. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. त्याचा स्वीकार करावा,असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता आहे. दरम्यान पत्रकार परिषद घेऊन आपण आपली भूमिका मांडणार असल्याचे वसंत मोरेंकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मनसेकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 



पत्रकार परिषदेत वसंत मोरे काय भूमिका मांडणार? याकडे लक्ष लागले आहे.