Government Scheme Display: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या नेतृत्वाखालील या योजनेवरुन श्रेयवादाची लढाई सुरु असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभर सुरु असलेल्या जनसन्मान मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार, प्रसार करताना त्यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला आहे. यावरुन नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येही चर्चा झाली. या बैठकीला अजित पवार उपस्थित नसल्याने त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही घटक पक्षांचं ऐकून घेतलं. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून वारंवार ही नाराजी उघडपणे व्यक्त केली जात असल्याचं दिसत आहे. असं असतानाच आता या वादामध्ये पुन्हा एकदा नव्या वादाची फोडणी मिळाल्याचं चित्र दिसत आहे.


अजित पवार Out; श्रीकांत शिंदे In


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर सरकारी योजनांचे देखावे साकारण्यात आले आहेत. मात्र वर्षा बंगल्यावरील देखावण्यांमधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गायब असल्याचं दिसत आहे. अजित पवार यांच्याऐवजी वर्षा बंगल्यावरील श्रीकांत शिंदे यांचा फोटो असल्याचं पाहायला मिळत आहे. ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील देखाव्यात देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो झळकत आहे. अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्ष पोस्टरवर दिसून येत आहे. या देखावण्यामध्ये ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि महाराष्ट्रच्या  नकाशातून देखील अजित पवार गायब असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


अजित पवारांनी शाहांच्या दौऱ्याकडे पाठ?


देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरुन सोमवारी सायंकाळी दिल्लीला परतले. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यासारखे नेते अमित शाहांबरोबर दिसून आले. अमित शाहांनी लालबागचा राजा मंडळामध्ये गणपतीचं दर्शन घेण्याबरोबरच फडणवीस, शिंदे आणि शेलारांच्या घरच्या बाप्पांचाही आशिर्वाद घेतला. अमित शाह यांच्याबरोबर अनेक नेते होते तरी त्यामध्ये अजित पवारांचा समावेश नसल्याने ते पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदेंच्या सेनेवर नाराज आहेत की काय अशी चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली.


असं असतानाच शाह यांच्या या दौऱ्यानंतर ते दिल्लीला निघण्यापूर्वी मुंबई विमानतळावर जवळपास पाऊण तास महायुतीमधील घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान या बैठकीला मात्र अजित पवार उपस्थित होते, अशी माहिती रात्री समोर आली.