COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई : वसईत मनसेनं गुजराती पाट्याविरोधात पुन्हा एकदा  आंदोलन छेडलंय. सोमवारी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजराती पाट्या असणा-या धाब्यावाल्यांना सज्जड दम देत या गुजराती पाट्या काढायला लावल्या. याआधीही आंदोलन करत मनसेनं या गुजराती पाट्या काढायला लावल्या होत्या. मात्र या धाबा मालकांना पुन्हा गुजराती पाट्या लावल्यात. आज वसईत राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे गुजराती पाट्यांचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.


राज्यव्यापी दौऱ्यावर


महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे. या दौ-यातील पहिली जाहीर सभा वसई येथील नरवीर चिमाजी अप्पा मैदानात संध्याकाळी होणार आहे. त्याआधी ते आज हुतात्मा चौकात जाऊन हुत्म्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करणार आहेत. ठाकरे यांच्या दौ-याचा पहिला टप्पा जाहीर झाला असून वसई येथील सभेनंतर पुढील पाच दिवसांत ते पालघर, भिवंडी, मुरबाड आणि बदलापूर येथे प्रत्येकी एक दिवस मुक्काम करणार आहेत. या मुक्कामादरम्यान ते पक्षाच्या स्थानिक कार्यकर्ते पदाधिका-यांशी तसेच प्रकल्पग्रस्त बाधितांशी चर्चा करणार आहेत. पण तत्पूर्वी आज होणा-या जाहीर सभेत राज ठाकरे यांच्या टीकेच्या निशाण्यावर कोण कोण आहे याबाबत उत्सुकता असणार आहे. वसई-नालासोपारा-विरार-पालघर भागात बहुजन विकास आघाडी राजकीय पक्षाचे तीन आमदार आहेत. वसई तालुक्यात स्थानिक मनसे कार्यकर्ते व सत्ताधारी बविआ याच्यातून विस्तव जात नाही. त्यामुळे स्थानिक नेतृत्व हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यपद्धतीवर ठाकरे काही भाष्य करणार का? याकडे स्थानिकांचं लक्ष लागलंय. 


राज ठाकरे ट्विटरवर 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे फटकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फेसबुक या सोशल मीडियानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरही प्रवेश केला आहे. आपले अधिकृत ट्विटर हँडल @RajThackeray या नावे त्यांनी सुरु करताच अनेक फॉलोअर्सनी राज ठाकरेंना फॉलो केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राज ठाकरेंना किती मोठ्या प्रमाणावर फॉलो करायला सुरुवात केलीय. पहिल्यात दिवशी राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ट्विटरच्या माध्यमातून दिल्या.
तूर्तास राज ठाकरे यांनी कोणतेही ट्विट केलेले नाही. तरीही त्यांचे फॉलोअर्स वाढतच चालले आहेत ही वस्तुस्थिती आहे. अशात राज ठाकरे यांचे पहिले ट्विट काय असेल? तसेच आगामी काळात राज ठाकरे कोणकोणत्या विषयांवर ट्विट करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.