Vasant More News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत ( ठाकरे गट ) मोठ्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नव्या नेत्यांना नाराज न करण्याचं धोरण ठाकरे गटाने आमलात आणल्याचं चित्र समोर आलं आहे. पुण्याचे दबंग नेते वसंत मोरे यांची शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी निवड करण्यात आली आहे. तर वरूण सरदेसाई, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना देखील मोठी जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळे आता विधानसभेला यांना आमदारकीचं तिकीट मिळणार की नाही? असा सवाल विचारला जाऊ लागलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिवपदी संजय लाखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ललिता पाटील, मुकेश साळुंके, वसंत मोरे यांची शिवसेना संघटकपदी नियुक्ती करण्यात आलीये. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर सर्वांचं लक्ष लागलंय. मनसे टू शिवसेना वाया वंचित असा प्रवास राहिलेला वसंत मोरे यांना हडपसरमधून तिकीट मिळणार का? अशी चर्चा देखील होताना दिसतीये. 


काय म्हणाले वसंत मोरे?


आज माझी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 'शिवसेना' उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब यांच्या आदेशानुसार माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसाहेब, शिवसेना खासदार संजय राऊतसाहेब आणि संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिरसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नेमणूक करण्यात आली, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली. 


दरम्यान, पुणे मनसेमध्ये वाद झाल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला. राज ठाकरे यांच्याशी बैठक झाल्यानंतर देखील वसंत मोरे यांनी मनसेमध्ये न थांबण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेच्या तिकीटासाठी वसंत मोरे इच्छूक होते. वंचितकडून वसंत मोरे यांना तिकीट मिळालं पण निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. लोकसभेनंतर वसंत मोरे यांनी ठाकरे गटाचं शिवबंधन बांधलं होतं. आता त्यांना आमदारकीचं तिकीट मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.