Pune News : पुण्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे यांचं फटाके फोडत स्वागत, तात्या म्हणतात...
Vasant More On Vanchit candidature : मनसेला जय महाराष्ट्र करून आता वसंत मोरे पुणे लोकसभेच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आता पुण्यातील (Pune Loksabha election 2024) राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.
Pune Loksabha election 2024 : वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेच्या जागेवर मनसेला रामराम ठोकणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी जाहीर केली. वसंत मोरे अपक्ष लढणार, असं निश्चित मानलं जात असताना आता वंचितने वसंत तात्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता पुण्यात (Pune Loksabha ) तिरंगी लढत होणार हे निश्चित झालंय. एकीकडे भाजपचे मुरलीधर मोहोळ तर दुसरीकडे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील वसंत मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आता वंचितकडून (Vanchit Bahujan Aghadi) तिकीट मिळाल्यानंतर वसंत मोरे यांचं फटाके फोडत स्वागत करण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात-धर्मीय 'वंचित बहुजनांसाठी' मी मैदानात येतोय. बदल घडणार अन् वसंत फुलणार, असं ट्विट वसंत मोरे यांनी केलं आहे. माझ्या विकासाचा पॅटर्न मी आता संपूर्ण पुण्यात गाजवणार. गेली 15 वर्ष मी इथं काम करतोय, आता देखील संपूर्ण शहराच्या विकासाचा ध्यास घेणार आहे. सुरूवातीपासून मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. मला संधी दिली त्याचं सोनं मी करेल आणि पुणे शहराचा खासदार म्हणून मी काम करण्यास तयार आहे. मी शेतकरी कुटूंबातील असल्याने आता मी सर्व समाजासाठी अग्रेसर असेल, असं वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
वसंत मोरेंचा मास्टरस्ट्रोक
एकीकडे वसंत मोरे यांनी वंचितकडून तिकीट मिळवलंय. तर दुसरीकडे सकल मराठा समाजाला देखील आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. वसंत मोरे यांनी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली. त्यामुळे आता वसंत मोरे यांनी वंचित तसेच मराठा समाजाची मतं देखील ताकद देऊ शकतात. तर राष्ट्रवादीची मतं वसंत मोरे यांच्या पदरी पडणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. वंचितने पाच उमेदवारांची यादी (Vanchit candidate List) जाहीर केली. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात वंचित उमेदवार देणार नाही, अशी घोषणा देखील केली आहे. बारामतीत शरद पवार गटाला वंचितचा पाठिंबा असल्याचं देखील जाहीर केलंय.
सुप्रिया सुळे म्हणतात...
बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाशजी आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.