पुणे : रात्रीच्या वेळी एखादी संशयास्पद हालचाल दिसली की कोणीही सतर्क होऊन जातं. त्यातच भर रस्त्याने जाताना असं काही दिसलं की, लगेचच आपला वेग मंदावतो. मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला. (Vasant more helped a woman also praised pmpml driver and conductor)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री कात्रज ओंढवा राजस चौकात भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासाठी गेलं असता तिथे मोरे यांना पीएमपीएलची एक बस उभी असल्याचं दिसलं. बसमध्ये लाईट सुरुच होते. कंडक्टर, अर्थात बसचा वाहक तिच्याभोवती फिरत होता. तर चालक/ ड्रायव्हर त्याच्या जागेवरच बसला होता. 


थोडा संशय चाळवल्यामुळे मोरेंनी नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या बसमध्ये एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती त्यांना मिळाली. बस सासवडहून आली होती आणि त्या महिलेला घेण्यासाठी तिचा दीर येणं अपेक्षित होतं. पण, 15 मिनिटं उलटूनही तिला आणण्यासाठी कुणीच आलं नव्हतं. 


अशा परिस्थितीत बसही सोडणं अशक्य आणि त्या महिलेला एकटं सोडणंही अशक्य होतं, अशी हतबलता चालक आणि वाहकानं सांगितली. मोरे यांच्या कानी ही बाब येताच त्यांनी जबाबदारीनं त्या महिलेला आपल्या वाहनातून तिच्या घरपर्यंत पोहोचवलं. 



बसचे चालक आणि वाहक या दोघांचेही मोरेंनी नावानिशी आभार मानले. नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर अशी त्या दोघांचीही नावं असल्याचं सांगत एका महिलेला त्यांनी केलेल्या मदतीबद्दल मोरे यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. 


कुटुंबीयांच्या हलगर्जीपणामुळं त्या महिलेवर ही वेळ आली, असं म्हणत बाळ असताना तिला एकटीला इतक्या रात्री एकटं सोडलंच का? या शब्दांत निराशा व्यक्त करत किमान शहाणे व्हा असा सूर त्यांनी आळवला.