जयेश जागड, झी मीडिया, अकोला: एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे. मात्र, एमआयएमकडून प्रत्यक्षात यासंदर्भातला कोणताही लिखित प्रस्ताव मिळाला नसल्याचे वंचित बहूजन आघाडीनं स्पष्ट केले. तर लोकसभेच्या निकालानंतर एमआयएम सोबत आमचे कोणतेही मतभेद झाले नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील दिली. ते सोमवारी अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करायची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. 


दरम्यान, लक्ष्मण मानेंसंदर्भात वंचितने काहीशी नरमाईची भूमिका स्वीकारल्याचे संकेत मानेंनी दिले.  मानेंशी मतभेद आहेत, मनभेद नाहीत असं सांगतानाच मानेंनी आपल्या भूमिकेचा विचार करावा, असे अण्णाराव पाटील यांनी सांगितले.



विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी सुरू.....


राज्यात एकीकडे विधानसभेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सोबत येण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वंचितने राज्यात विधानसभेसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा लावला आहे. आज अकोल्यात बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील १५ मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.


अकोल्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर आज वंचितने विधानसभेसाठी उमेदवारांच्या  मुलाखती घेतल्या आहेत. उमेदवार निवडीसाठी वंचितने नियुक्त केलेल्या तीन जणांच्या संसदीय मंडळाने या मुलाखती घेतल्यायेत. जवळपास १२५ इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिल्या.


आतापर्यंत नागपूर आणि अमरावती येथे मुलाखती घेण्यात आल्या. या महिन्याच्या शेवटपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती होतील. या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने 'एकला चलो रे'चे संकेत दिल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसवर दबाव वाढविण्यासाठी वंचितची ही खेळी तर नाही ना?, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.