Na Dho Mahanor Death : महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख निसर्गस्वप्न अशी ज्यांची ओळख करून दिली जाते अशा ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी जगाचा निरोप घेतला. गुरुवारी, (3 ऑगस्ट 2023) पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनासमयी ते 80 वर्षांचे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले . मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.


एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीतं आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत. 


महानोर यांना मिळालेले पुरस्कार.... 


साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी महानोर यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांना 1991 साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, 2015 साली जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, कृषीभूषण (महाराष्ट्र शासन) 1985, 'वनश्री' पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल. 1991, 'कृषिरत्न' शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्द्ल सुवर्ण्पदक 2004, डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार 2004, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, 2009 साहित्य अकादमी पुरस्कार, 2000 'पानझड', विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) आणि 'मराठवाडा भूषण' अशा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. 


 





शरद पवार म्हणतात, माझे जवळचे मित्र....


'माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो', असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या मित्राच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं.