सोलापूर : ज्येष्ठ कवी, लेखक आणि विचारवंत डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काल संध्याकाळी घरात लेखन करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना शहरातील मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. 


 आज अंत्यसंस्कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्यावर आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बोल्ली यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. तेलुगू भाषिक कुटुंबात जन्म घेऊनही लक्ष्मीनारायण बोल्ली यांचं मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व होतं. तेलुगू भाषेचे जाणकार, उत्तम कवी आणि समीक्षक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. 


२४ पुस्तके प्रकाशित 


'एका साळियाने' हे त्यांचे आत्मचरित्र फार गाजले. तेलुगू आणि मराठी भाषेत त्यांची जवळपास २४ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याला स्थान देण्यात आलेलं आहे. आंध्र प्रदेशमधील पोट्टी श्री रामुलू विद्यापीठाने त्यांना मानद डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते.