व्हिडिओ : नाशिकमध्ये गोदावरीनं धारण केलं रौद्र रुप, नदीकाठची मंदिरं पाण्याखाली
गोदावरी नदीच्या शेजारी राहणाऱ्या अनेक कुटुंबांना लवकरात लवकर जागा खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्यात
नाशिक : मुसळधार पावसानं नाशिकमधल्या गोदावरी नदीनं रौद्र रुप धारण केलेलं दिसतंय. त्यामुळे नाशिकमध्ये अनेक जागी पाणी भरलंय. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं धरण ओव्हर फ्लो झालंय. नदीच्या पाण्यामुळे अनेक मंदिरं पाण्यात बुडालीत. न्यूज एजन्सी एएनआयच्या एका व्हिडिओमध्ये गोदावरी नदीच्या जवळची उंच अशी हनुमानाची मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहचलेलं दिसतंय.
नदीच्या किनाऱ्यावर उभारलेली अनेक मंदिरं पाण्यात बुडालेली आहेत. गोदावरी नदीच्या शेजारी राहणाऱ्या अनेक कुटुंबांना लवकरात लवकर जागा खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परत येण्यास नागरिकांना सांगण्यात आलंय.
राज्यातील आपत्तीव्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नाशिक क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरण ७४ टक्के भरलंय. गोदावरी नदीचं उगमस्थळ नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आहे.
महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर गुजराच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी या राज्यांत जोरदार पाऊसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.