COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावेर, जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसेंनी अप्रत्यक्षपणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. 


भोसरी एमआयडीसी प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावं लागल्यानं खडसे केवळ नाराज नाहीत तर मनातून दुखावले गेले आहेत. या संपूर्ण प्रकरणात पक्ष किंवा पक्षाचे नेते आपल्या पाठिमागे उभे राहिले नाहीत, अशी भावना खडसेंच्या मनात घर करून आहे... हीच आपल्या मनातील भावना, व्यथा मांडण्यासाठी खडसेंनी हिंदी सिनेमातल्या गाण्यातून मांडली...


रहते थे कभी जिनके दिल में


हम जान से भी प्यारों की तरह


बैठे हैं उन्ही के कूचे में


हम आज गुनहगारों की तरह


मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी 


गेल्या अधिवेशनातही खडसेंनी एमआयडीसी घोटाळ्या संदर्भात आपल्याला शासनाचा जीआर उपलब्ध होत नसल्याबद्दल निराशा व्यक्त केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे पेपर विधिमंडळात सादर केले जातील असं आश्वासन दिलं होतं. एमआयडीसी जमिनीबाबतचा शासनाचा जीआर मिळाला तर आपल्यावरचे आरोप आपल्याला पुराव्यांसह फेटाळता येतील, असं त्यांचं म्हणणं होतं. 


एकनाथ खडसे पक्ष सोडणार की नाही? यावर मात्र थेट उत्तर देणं खडसे सध्या टाळत आहेत. पण पक्षात राहूनही पक्षातील नेत्यांना मुख्यत: मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताना ते दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी आणि भाजपसाठी ही डोकेदुखी ठरतेय. 


'पक्ष सोडायला भाग पाडाल तर...' 


भोसरी एमआयडीसी प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावं लागल्यानं नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही असा सज्जड इशारा खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून जळगावमध्ये दिलाय.


जनतेच्या मनात माझ्याबद्दल उत्सुकता आहे की आपण अशा काय भानगडी केल्यात. गुन्हेगार असेल तर आपल्याला तुरुंगात टाकावं असं खुलं  आव्हानच खडसेंनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. आपल्याला पक्षाकडून उत्तर हवं की आपण कुठं पैसा कमविला, कुठं भ्रष्टाचार केला. सरकार आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे कि त्यांनी दाखवून द्यावं कि आपण कुठं चुकलो असेही खडसे यावेळी म्हणाले.