Raigad Crocodile Residential Apartment: राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. रायगडमधील इरसालवाडीवर दरड कोसळून अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. इरसालवाडीबरोबरच इतरही अनेक गावांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक नद्यांमधील पाणी नागरी वस्तीमध्ये शिरलं आहे. मात्र या पुराच्या पाण्याबरोबर नदीमधील मगरही मानवी वस्तीत शिरल्याची घटना रायगडमध्ये समोर आली आहे.


इमारतीमध्ये दिसली मगर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडमधील माणगावमधील कचेरी रोडवरील ओम अपार्टमेंट इमारतीमध्ये गुरुवारी रात्री ही महाकाय मगर आढळून आली. ही मगर पाहून स्थानिकांची भितीने गाळण उडाली. परिसरामध्ये मगर असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाला. सोसायटीच्या आवारामध्ये मगर असल्याची माहिती रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाला दिली.


असे प्राणी दिसले तर काय करावं?


यानंतर कोलाड येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा मगरीला पकडून तिला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिलं. मात्र या प्रकरणामध्ये पूर आलेल्या भागांमध्ये वावरताना काळजी घेणं किती गरजेचं असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. अनेकदा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर नदीमधील मासे, मगरी यासारखे जलचर नागरी वस्तीच्या भागात येतात. पूराचं पाणी ओसरुन गेल्यानंतरही यापैकी बरेच प्राणी या भागांमध्ये वेगवेगळ्या कारणाने अडकून पडतात. अशीच ही मगर ओम अपार्टमेंटमध्ये अडकली. असे प्राणी दिसल्यास किंवा आढळून आल्यास तातडीने स्थानिक पोलिसांना किंवा आपत्ती व्यवस्थापन केंद्राला फोन करुन त्यासंदर्भात माहिती द्यावी. 



कोटामध्येही रस्ता ओलांडताना दिसली मगर


राजस्थानमधील कोटा शहरामध्येही काल अशाच प्रकारची घटना घडली. या शहरामध्ये रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावरुन मगर रस्ता ओलांडताना दिसली. या मगरीचा व्हिडीओ शहरामध्ये काही वेळात व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं.



याआधीही कोटा शहरातील बजरंग नगर आणि परिसरात मगरींचं दर्शन झालं होतं. मागील वर्षीही या भागामध्ये दोन डझनहून अधिक मगरींना वन्यप्रेमींनी या भागातून पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं होतं. कोटा शहरातून चंबळ नदी वाहते. अनेकदा कालव्यातून मोठ्या आकाराच्या मगरी शहरातील रस्त्यांवर येतात. कोटा शहरातील मोठ्या नाल्यांमध्येही मगरी फार मोठ्या संख्येने दिसून येतात. शहरातील रस्त्यांवर असो किंवा शेतात असो या शहरामध्ये मोठ्या आकाराच्या महाकाय मगरी अनेकदा दिसून येतात. या मगरींमुळे नागरिकांपासून शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण असतं.