यवतमाळ : कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासह अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस खात्याच्या कार्यालयातच जुगार अड्डा चालत असल्याचा आणि पोलीस कर्मचारीच पत्ते व पैशांचा खेळ खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यवतमाळच्या दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हा पत्याचा डाव रंगला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्युटीवर तैनात पोलीस अधिकारी व कर्मचारी चक्क कार्यालयातच जुगार खेळत असतांनाचा हा धक्कादायक व्हिडीओ पुढं आल्यानं कायद्याचं रक्षण करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, तेच कायद्याला पायदळी तुडवित असल्याचं उजेडात आल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे.


मागासलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत, दारू, गोवंश आणि गुटखा तस्करी बिनधास्त सुरू आहे. 


विशेष म्हणजे यवतमाळ जिल्हा राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे मतदार क्षेत्र आहे. जिल्ह्यात अवैध धंदे नाहीत असे दावे गृहराज्यमंत्री व पोलीस अधीक्षक करीत असतात. 


मात्र, दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातच सुरू असलेला जुगार अड्ड्याचा हा व्हिडिओ बघून तरी ते कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.