दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषदेच्या दोन जागा लढवण्यासाठी सुरुवातीपासून आग्रही असणाऱ्या काँग्रेसने शेवटच्या क्षणी एक जागा लढवण्याचा मान्य केलं आणि या बदल्यात बरचं काही कमावलं असं म्हणावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास महाविकासआघाडीला पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरावे लागणार होते. यात शिवसेनेच्या वाट्याला दोन राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वाट्याला दोन आणि काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येत होती. मात्र काँग्रेसने काल आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले होते.


काँग्रेसने यातील एका उमेदवाराचा अर्ज भरू नये यासाठी काल रात्रीपासूनच शिवसेना व राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यासाठी रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही भेटले होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली होती. तरीही काँग्रेस दोन जागा लढवण्यावर ठाम होते.


अखेर संध्याकाळी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आणि काँग्रेसची समजूत काढण्यात यश आलं. काँग्रेस आता विधानपरिषद निवडणुकीत एकच उमेदवार उतरणार आहे. राजेश राठोड हे काँग्रेसतर्फे अर्ज भरणार आहेत तर पापा मोदी हे अर्ज भरणार नाहीत. महाविकास विकास आघाडीच्या बैठकीतील वाटाघाटीत काँग्रेसने बरच काही पदरात पाडून घेतले.


काँग्रेसला काय मिळालं? 


- सत्तावाटपात काँग्रेसचा यापुढे सन्मान राखला जाईल


- यापुढे सत्ता वाटप करताना संख्याबळाचा विचार केला जाणार नाही


- सत्तेतील सर्व पदांचं वाटप तीनही पक्षात समान होणार


- महामंडळाचे वाटप, यापुढील सर्व विधानपरिषदेच्या जागांचं समान वाटप होणार


- शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद असल्याने सध्या शासनाच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे, यापुढे मात्र निर्णय प्रक्रियेत काँग्रेसलाही सामावून घेतले जाणार. त्यांचा सन्मान केला जाणार, असं आजच्या बैठकीत ठरलं आहे.


विधानपरिषदेवर कोण जाणार?


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रही होते. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे शिवसेनेकडून उद्धव ठाकरेे आणि नीलम गोऱ्हे यांचंं नाव निश्चित आहे. शिवसेनेने अजून नीलम गोऱ्हेंच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसेने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या चारही उमेदवारांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे, तर महाविकासआघाडीचे उमेदवार सोमवारी दुपारी अर्ज दाखल करणार आहेत.