जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ `या` व्यक्तीची वर्णी
Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar NCP: जागा वाटपासंदर्भात दिल्लीपासून मुंबईपर्यंत चर्चा सुरु असताना आणि जागावाटप निश्चित होण्याआधीच अजित पवार गाटची घोषणा
Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar NCP: दिल्लीपासून मुंबईपर्यंत महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा केली. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय होऊन जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची बातमी सूत्रांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटाने राज्यातील आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
कोण आहे पहिला उमेदवार?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची जनसमान यात्रा आज दिंडोरीमध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. विशेष म्हणजे कालच्या बैठकीला दांडी मारणारे आमदार नरहरी झिरवाल आजच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. उपस्थिती दाखवून नरहरी झिरवाळ यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला. यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी झिरवाळ यांनी थेट उमेदवारी जाहीर केली. "दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील. नरहरी झिरवाळ दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील," असं म्हणत तटकरेंनी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला. या घोषणेपूर्वी केलेल्या भाषणामधून झिरवाळ यांनी शरद पवार गटामध्ये जाण्याच्या शक्यतेवर खास शैलीत टीप्पणी करत आपण अजित पवारांबरोबरच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
मी इच्छुक आहे असं म्हणण्यापेक्षा...
नरहरी झिरवाळ यांनी आपल्या भाषणामध्ये, "अजित पवार पूर्ण मतदारसंघात दोन मेळावे घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून ही बैठक आहे. मी इच्छुक आहे असं म्हणण्यापेक्षा जनतेने सांगावं की मी लढावं की नाही. बरा का साधरण का चांगला आहे? याचा जनतेसह कानोसा तुम्ही देखील घ्या, असं झिरवाळ भाषणामध्ये आपल्या उमेदवारीसंदर्भात म्हणाले.
नक्की वाचा >> Vidhan Sabha Election 2024: राज्यातील पहिलीच लढाई बाप विरुद्ध बेटा? वडील म्हणाले, 'त्याचा बाप..'
शरद पवारांकडे जाणार का?
"शरद पवार साहेब हे सगळ्यांचे दैवत आहेत. देशात राज्यात साहेब हे साहेब आहेत. विरोधकांचे देखील ते साहेब आहेत. राजकारणात घडामोडीनुसार पर्याय निघाल्यानुसार पसंती क्रमांकानुसार पहिल्यापासून मी अजित पवारांसोबत आहे. एकाच वेळी नाही तर तीन वेळेस मी त्यांची साथ दिली आहे. पहाटेच्या शपथविधीला देखील मी उपस्थित होतो. भविष्यातही मी दादांसोबतच राहणार आहे," असं झिरवाळ यांनी सांगितलं.
कालच्या बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण काय?
कालच्या बैठकीला अनुपस्थित असण्यामागील कारणही झिरवाळ यांनी सांगितलं. "राजकारण करत असताना काही ठिकाणी अडीअडचणी येतात. याबाबत मी जिल्हाप्रमुखांना कल्पना दिलेली होती की मला येणे शक्य नाही," असं सांगितल्याचं झिरवाळ म्हणाले.
माझ्या मुलाने का माझ्या बाईने सांगू दया पण...
"फार वेळ घेणार नाही चॅनेलवाल्यांना सांगतो. तुम्ही मला घेरून ठेवलंय. झिरवाळ इकडे का तिकडे? मी फक्त तोंड धुवून पहाटेच्या शपथविधीला गेलो होतो. माझ्यासोबत काँग्रेसचे हिरामण खोंसकर होते त्यावेळी. माझ्या मुलाने का माझ्या बाईने सांगू दया पण मी अजित पवारांसोबतच राहणार," असं झिरवाळ म्हणाले. तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. "मला उपाध्यक्ष केलं त्यांनी (अजित पवारांनी.) अजित पवार, सुनील तटकरे यांनी माझ्या मतदारसंघात खूप निधी दिला आहे. कामं केली आहेत. त्यामुळेच तिसऱ्यांदा मला लोकांनी निवडून दिलं आहे," असं झिरवाळ म्हणाले.