कल्याण : कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना उमदेवारी दिली आहे. बाहेरचा उमेदवार नको अशी गळ शिवसैनिकांनी नेतृत्वाकडे घातली होती. यानंतर विश्वनाथ भोईर यांना तिकीट देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळाल्यानंतर अनेक इच्छुक असल्यामुळे बंडाळीला उत आला होता. यानंतर ठाकरे घराण्यातील आणि शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांना उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं, पण अखेर शिवसेनेने स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. २०१४ साली या जागेवर भाजपचे नरेंद्र पवार निवडून आले होते. आता शिवसेनेला ही जागा गेल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. कल्याण पश्चिमेतील सर्व भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.


कल्याण पश्चिम हा बालेकिल्ला असून भाजपच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करण्याचा उघड उघड इशारा शिवसेनेने दिला होता. सुरुवातीला नरेंद्र पवार यांच्या उमेदवारीला आक्षेप घेणारे भाजपमधील इच्छुक पदाधिकारीही हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने नाराज झाले आहेत.


विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, असा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. त्यावर आता नरेंद्र पवार काय निर्णय घेतात हे लवरकच स्पष्ट होईल. जर पवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर शिवसेनेसाठी ही जागा धोक्याची ठरु शकते. त्यामुळे भाजप पवार यांचे मन कसे वळवतात याची उत्सुकता आहे.