Baramati LokSabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) असा सामना रंगणार आहे. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तर बारा तारखेला बारा वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे बारा वाजवणार, अशी गर्जना शिवतारेंनी सासवडमधील बैठकीनंतर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्थी करुनही विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यावर ठाम असून आज झालेल्या बैठकीत त्यांनी 12 एप्रिल रोजी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले विजय शिवतारे?


विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत होते. मात्र, शिवतारेंनी अजूनही हट्ट सोडला नाही. मुख्यमंत्र्याशी चर्चा झाल्यानंतर शिवतारेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली अन् 1 एप्रिलपासून प्रचाराला सुरूवात करणार असल्याचं सांगितलं. मला बारामतीतूनच नाही तर महाराष्ट्रातून फोन येत आहेत. काहीजण म्हणतात मी शरद पवारांचा हस्तक झालोय. पण मी घराणेशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात लढतोय, असं विजय शिवतारेंनी म्हटलं. त्यावेळी 'बारा तारखेला बारा वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे बारा वाजवणार', असं म्हणत शिवतारेंनी दंड थोपटले आहेत.


दरम्यान, अजित पवारांची पत्नी म्हणून आम्ही मतदान का करायचं? अशी विचारणाही त्यांनी केली. 2024 ची विधानसभा हे सगळे वेगळे लढतील असाही दावा त्यांनी केला. अजित पवार हे जिंकू शकत नाहीत असंही ते म्हणाले. या लढाईत मी विभीषण आहे तर रावण कोण असेल हे सगळ्यांना माहीत आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला होता. बारामतीत लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाही, कुटुंबशाही, साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला होता.


शिवतारेंनी घेतली संजय मामांची भेट


शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी राज्यमंत्री बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणारच यावर ठाम असलेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची इंदापुरात भेट झालीय. काल इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना  गोतंडी गावच्या हद्दीत रस्त्यावर ही दोघांची भेट झालीय. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी विजयी शिवतारे यांनी आपला निर्णय मागे घ्यावा आपण आता एकत्रित आहोत महायुतीचा धर्म पाळावा अशी चर्चा झाली. मात्र विजय शिवतारे यांनी मला राजकारणात पवार कुटुंबाचा खूप त्रास झाला आहे असे म्हणतआपल्या मतांवर ठाम असल्याचं सांगण्यात आलेय. दरम्यान या दोन्हीही माजी राज्यमंत्र्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होताना दिसत आहेत.