नितेश महाजन, झी मीडिया, जालना: कोरोनासारख्या संकटकाळातही ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध न करुन दिल्याने जालन्यात वीरशैव लिंगायत समाजाच्या लोकांनी अपरिहार्यतेतून टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. भोकरदन तालुक्यातील राजूर येथे ही घटना घडली. याठिकाणी वीरशैव लिंगायत समाजाच्या लोकांनी ग्रामपंचायतीसमोरच बुल्डोझरने खड्डा खणून एका मृताचा दफनविधी केला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजूर गावात विरशैव लिंगायत समाजाला  स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यांनी यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार दाद मागितली होती. मात्र, कोणीही दखल न घेतल्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करत ग्रामंपायतीसमोरच बुल्डोझरने खड्डा खोदून मयत महिलेचा मृतदेह दफन केला.

शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. वीरशैव लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा देण्यात यावी अशी मागणी या संघटनेच्यावतीने ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. पण स्मशानभूमीला जागा न मिळाल्याने विरशैव लिंगायत समाजाकडून मयत झालेल्या मणकर्णिकाबाई शिवमूर्ती आप्पा जितकर  यांचा मृतदेह थेट ग्रामपंचायत समोर खड्डा करून समाजाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे आता प्रशासन यावर काय कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.