हे आहेत महाराष्ट्रातले सर्वात गरीब आमदार
महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब आमदार म्हणून काही दिवसांपासून यांची चर्चा आहे
हर्षद पाटील, झी मीडिया, डहाणू : महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब आमदार म्हणून काही दिवसांपासून यांची चर्चा आहे. त्यांच्याकडे राहायला स्वतःचं घरही नाही.... त्यांच्याकडची रोख रक्कम किती आहे हे पाहाल, तर तुम्हीही थक्क व्हाल.
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण शेतात राबणारे, गायीगुरांना चरायला नेणारे हे आमदार आहेत. डहाणू मतदारसंघातून विजयी झालेले हे माकपाचे विनोद निकोले..
महाराष्ट्रातले सगळ्यात गरीब आमदार आहेत. त्यांच्याकडे फक्त 51 हजार 82 रुपये एवढीच रोख रक्कम आहे. राहायला स्वतःचं घरही नाही.
विनोद निकोले डहाणू जवळच्या वाकी गावात एका खोलीत भाड्याने राहतात. या अतिशय सामान्य माणसाला मतदारांनी आमदार म्हणून निवडून दिलं आहे.
विनोद निकोलेंचा जन्म शेतमजूर कुटुंबातला. पैसे नसल्यानं शिक्षण अर्धवट सोडलं आणि विनोद माकपाचे कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. त्यांची पत्नी बबिता आश्रमशाळेत सेविका आहेत. चार ते पाच हजारांत निकोले कुटुंब महिन्याचा खर्च भागवत होतं.
निवडणूक लढवायची आणि जिंकायची तर बक्कळ पैसा लागतो, या समजाला निकोले यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.