`हात दाखवा, गाडी थांबवा` तत्वावर धावते पुणे मेट्रो? Video पाहून तुम्हीही म्हणाल, `हे पुणेकरच...`
Viral Video Pune Metro Only a Punekar Can Do This: सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी हे असं केवळ आणि केवळ पुण्यामध्येच घडू शकतं असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल यात शंका नाही.
Viral Video Pune Metro Only a Punekar Can Do This: पुणे तिथे काय उणे! असं म्हटलं जातं. सामान्यपणे जगात जे इतर कुठेही, कोणालाही करता येत नाही ते पुणेकर करु शकतात असं मस्करीत म्हटलं जातं. त्यासाठी अनेकदा पुणेकरांचे असेच थक्क करणारे किस्से सांगण्यासाठी पुणे तिथे काय उणे! या वाक्याचा वापर करतात. याच वाक्याचा प्रयत्यय नव्याने आणणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल जाला आहे. हा व्हिडीओ नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो मार्गावरील आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
व्हायरल झालेला व्हिडीओ नव्याने पुण्यात सुरु झालेल्या वनाझ ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट मार्गांपैकी पिंपरी चिंचवड-सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्गावरील आहे. सिव्हिल कोर्ट स्थानकावरुन पिंपरी-चिंचवडसाठी सुटणाऱ्या मेट्रोचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ लोको पायलेटच्या केबीनच्या दरवाजाजवळ म्हणजेच मेट्रोचा चालक बसतो त्या पहिल्या डब्ब्याजवळ प्लॅटफॉर्मवरुन शूट करण्यात आला आहे. मेट्रोचे दरवाजे बंद होतात. मात्र काही क्षणांमध्ये तिथे पोहोचलेले एक पुणेकर काका दरवाजे बंद असलेल्या या मेट्रोच्या लोको पायलेटच्या केबीनचा दरवाजा ठोठावतात. एकदा नाही तर दोन वेळा हे काका दरवाजा ठोठावतात. त्यानंतर कोण दार ठोठावतंय हे पहायला लोको पायलेट बाहेर येतो तेव्हा हे काका मेट्रोचा दरवाजा उघडण्यास सांगतात. हा लोको पायलेट खरोखर मेट्रोचे सारे दरवाजे उघडतो आणि काका आत जातात. दरवाजे पुन्हा बंद होतात.
ड्रामा इथेच संपत नाही तर...
मात्र हा प्रकार इथेच संपत नाही. ही मेट्रो काही अंतर पुढे येते आणि पुन्हा एक लाल शर्टमधील व्यक्ती लोको पायलेटचा दरवाजा ठोठावतो. पुन्हा लोको पायलेट कोण दरवाजावर थापा मारतंय पाहायला बाहेर येतो अन् पुन्हा तीच मागणी होते. दरवाजे उघडा. हा लोको पायलेट पुन्हा दार उघडतो तेव्हा मध्यमवयीन पुणेकर मेट्रोत शिरतो. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
प्रतिक्रियांचा पाऊस
हा व्हिडीओ सोशल मीडियावर, पुणे तिथे काय उणे! सुटलेल्या मेट्रो ट्रेनला थांबवणे! या मजकुरासहीत व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर हसणारा इमोजी आणि नमस्कार करत असल्याचा इमोजीही दिसत आहे. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
1) खरंच पुण्यात काहीही होऊ शकतं
2) ड्रायव्हर म्हणाला असेल...
3) शिटं भरत नसतील...
4) कौतुकास्पद काहीच नाही
5) हात दाखवा गाडी थांबवा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी वनाझ ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट मार्गांचा उद्घटान झालं आहे.