आजीच्या मदतीला धावली, 10 वर्षांची मुलगी सोनसाखळी चोराला भिडली... Video व्हायरल
सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण पुण्यातील सोनसाखळी चोरीच्या एका घटनेची सध्या सगळीकडे चर्चा होत असून घटनेतील वृद्ध महिला आणि तिच्या नातीचं कौतुक केलं जात आहे
Viral video : सोन साखळी चोरावर झडप घालून प्रतिकार करणाऱ्या आजी आणि नातीची सध्या पुण्यात (Pune) जोरदार चर्चा सुरू आहे. आजी-नातीने दाखवलेल्या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत आहे. सोनसाखळी चोरीच्या (Chain Snatching) घटनांमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दुचाकीवरुन आलेले चोर एकट्या किंवा वृद्ध महिलेला पाहून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी (Gold Chian) किंवा मंगळसूत्र खेचून फरार होतात. अनेक प्रकरणात पोलिसांनी (Pune Police) कारवाई देखील केली आहे, पण सोनसाखळी चोरी प्रकरणात घट झालेली नाही.
पुण्यातल्या घटनेची चर्चा
पुण्यात सोनसाखळी चोरीची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून सगळीकडे त्या वृद्ध महिलेचं आणि तिच्या 10 वर्षांच्या नातीचं कौतुक होत आहे. चैन चोरी करण्यासाठी दुचाकीवरुन आलेल्या एका चोराला आजी आणि तिच्या नातीने मिळून चांगलाच धडा शिकवला. त्यांच्या विरोधापुढे धडधाकट चोराला पळता भूई थोडी झाली.
काय आहे नेमकी घटना?
पुण्यातील शिवाजीनगर (Pune Shivaji Nagar) इथल्या मॉडल कॉलनी इथली रात्री आठ वाजताची ही घटना आहे. एक वृद्ध महिला आपल्या दोन नातींसह रस्त्याने पायी घरी जात होती. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेला चोर वृद्ध महिलेच्या बाजूला येऊन थांबतो. पता विचारण्याच्या बहाण्याने तो त्या वृद्ध महिलेला थांबवतो आणि संधी बघताच वृद्ध महिलेच्या गळ्यात सोन्याची साखळी चोरण्याचा प्रयत्न करतो.
10 वर्षांची नात भिडली
पण प्रसंगावधान दाखवत त्या वृद्ध महिलेने चोरट्याचा हाथ घट्ट पकडून ठेवला. अचानक घडलेल्या या घटनेने वृद्ध महिलेबरोबर असलेल्या दोन छोट्या मुली थोड्याश्या घाबरतात. पण त्यातली एक मुलगी धाडस दाखवत आजीच्या मदतीला धावली आणि तीने चोरट्याला हातातल्या बॅगने मारायला सुरुवात केली. आजी आणि नात त्या चोरट्यावर अक्षरश: तुटून पडतात. वृद्ध आणि लहान मुली असल्याचं बघून चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याला हा प्रतिकार अनपेक्षित होता. दोघींचा आवेश पाहून अखेर त्या चोराला रिकाम्या हाताने पळ काढावा लागला.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून त्या आजीचं आणि तिच्या 10 वर्षांच्या नातीचं सर्वत्र कौतुक होत आहे. आजीच्या मदतीला धावलेल्या नातीचं धाडस प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस त्या सोनसाखळी चोराचा शोध घेत आहेत.