प्रथमेश तावडे ,झी मीडिया,विरार : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीत किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. लढण्याची आणि जगण्याची शक्ति, प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक गड़-किल्ल्यांचा उपयोग अनेकदा चुकीच्या गोष्टींसाठी होतोय. गडकिल्ल्यांवर जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालणे, प्रेमाच्या नावाखाली गैरकृत्य करणारे तरुण-तरुणी या ऐतिहसिक ठेव्याची रया घालवताना दिसतात. अशा तरुणांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम विरार येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या चिमुकलीने केले आहे. उर्वी पाटील असे या चिमुकलीचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार अर्नाळा येथील किल्ल्याला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र हा किल्लाही अनैतिक गोष्टींपासून दूर राहिलेला नाही. या किल्ल्यावर येणारे अनेकजण या ठिकाणीच दारू पितात. दुर्दैव म्हणजे या दारूच्या बाटल्या याच ठिकाणी टाकतात. त्यामुळे या किल्ल्यावर दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला होता.



मात्र मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले तसेच दुर्गप्रेमी निनाद पाटील यांच्या चिमुकलीने आपल्या वडिलांसोबत किल्ल्यात तळीरामांनी फेकलेल्या बाटल्या जमा करून किल्ल्याची स्वच्छता  केली. तिच्या या कामाने किल्ल्यात दारुपिणाऱ्या तळीरामांना चांगलीच चपराक बसली आहे.


तिचे वडील निनाद पाटील हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. मागील साडेतीन वर्षे उर्वी वडिलांना सामाजिक कामांत हातभार लावते आहे. विशेष म्हणजे लहान वयात अर्नाळा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असलेला देवनागरी शिलालेख वाचून दाखवते. तिच्या या गुणाचं राज्यभरातून कौतुक होतंय.