सांगली मतदार संघाचा तिढा सुटला, विशाल पाटील उमेदवार असणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे.
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम क्षणी विशाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पत्रकार परिषद घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चा करून सांगलीची जागा घेतल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये राहून स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी परवानगी दिल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले आहे. मात्र यामुळे भाजप आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर नाराज झालेत. ते बंडखोरी करणार असून ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कोण आहेत विशाल पाटील ?
काँग्रेसचे विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा नातू आहेत. विशाल हे माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांचा मुलगा आहे तर विशाल हे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत. विशाल पाटील हे सद्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. विशाल पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. काँग्रेसचा आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे. मात्र टीका टिपणी यामुळे राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावर नाराज आहेत.
यावेळेला त्यांना काँग्रेस नेत्यांनी सांगलीतून उमेदवारीसाठी विचारणा केली होती, मात्र त्यांनी नकार देत विधानसभा लढवणार असल्याचं सांगितलं. तसेच पाटील कुटुंबाने भाजपचा प्रस्ताव पण नाकारला. स्वाभिमानी कडे मतदारसंघ जातोय म्हंटल्यावर त्याला विरोध करत, पाटील कुटुंबीयांनी वसंतदादा प्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यावर तोंडसुख घेतलं. आणि बंडखोरी करण्याचे संकेत दिले होते. खासदर राजू शेट्टी यांनी हा मतदारसंघ घेऊ नये यासाठी प्रयत्न केले. मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी विशाल पाटील याना उमेदवारीचा प्रस्ताव दिला. मात्र अपक्ष लढतो तुम्ही सहकार्य करा असे विशाल पाटील यांनी शेट्टी यांना सांगितलं, तो प्रस्ताव शेट्टी यांनी फेटाळला. मात्र अंतिम क्षणी विशाल पाटील यांच्या नावावर राजू शेट्टी यांनी शिक्कामोर्तब केले. मात्रबविशाल पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा होता विरोध होता, त्यामुळे ते काय करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेस आणि विशाल पाटील
सांगली जिल्ह्यात सद्या विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम असे काँग्रेसचे दोन गट आहेत. विशाल पाटील यांनी सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या विरोधी भूमिका घेतली होती. मात्र या निवडणुकीत मोहनराव कदम हे विजयी झाले होते. निवडणुकीत विरोधी भूमिका घेतली होती, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी कबूल ही केले आहे. 2013 ते 2018 या काळात सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती. मात्र महापौर हारून शिकलगार हे मदन पाटील गटाचे होते, तर उपमहापौर विजय घाडगे हे विशाल पाटील गटाचे होते. आणि विशाल पाटील गटाचे उपमहापौर आणि नगरसेवक हे उघडपणे काँग्रेसच्याच महापौर विरोधात भूमिका घेत होते.
2018 च्या सांगली महापालिका निवडणुकित पण विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या गट तटाचा फटका काँग्रेसला बसला होता, आणि भाजपा काठावरच्या बहुमताने सत्तेत आली. विशाल पाटील गटाचे माजी उपमहापौर आणि 2018 ला अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक विजय घाडगे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला पाठिंबा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी स्टेजवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे
असतानाच, विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच नाव घेऊन, जयंत पाटील साहेब तुम्ही, प्रतीक पाटील यांना मागील निवडणुकीत हरवले अशी टीका केली होती. माझ्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसल अशी टीका विशाल पाटील यांनी जाहीरपणे केली होती. आताच्या निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी एकमेकांवर गंभीर टीका केली होती.