Maharashtra APMC Election Result :  कोल्हापुरकरांनी पुन्हा एकदा नाद खुळा कारनामा केला आहे. कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतपेट्यांमध्ये मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या आहेत. राजकारण्यांना कानपिचक्या देणरा मजकूर या चिठ्ठ्या आहे. एवढंच नव्हे तर काही मतदारांनी मत देण्यासाठी दिलेले पैसे मतपेटीतून परत केले आहेत. कोल्हापुरकरांच्या या चिठ्ठ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतपेटीमध्ये चिठ्ठ्यांसह 500 रुपयांच्या नोटाही सापडल्या आहेत. आपल्याला मतासाठी दिलेले पैसे निवडणूक आयोगाला द्यावं, असं चिठ्ठ्यांमध्ये लिहिण्यात आले आहे. रविवारी सकाळपासून कोल्हापूर शहरातील रमणमाळा इथं कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत मतदारांनी चिठ्ठ्या टाकून राजकीय नेत्यांन कानपिचक्या दिल्या आहेत. नेत्यांमधलं तडजोडीचं राजकारण मान्य नाही, असा मजकूर चिठ्ठ्यांमध्ये सापडला आहे.


विखे पाटलांचा दणदणीत विजय 


नगरमधल्या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विखे पाटलांचा दणदणीत विजय झाला आहे. सर्व जागा जिंकत विखेंनी थोरातांचा पराभव केला आहे. राहाता बाजार समितीवर 18 जागा जिंकत भाजपची सत्ता आलीय. विखे गटाने आपल्या बालेकिल्ल्यात थोरात गटाचा धुव्वा उडवला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विखे गटाला खातेही उघडता आले नव्हते. आणि आज विखेंच्या बालेकिल्ल्यात देखील थोरात गटाला भोपळाही फोडता आला नाही. 


संजयकाका पाटलांना जोरदार दणका


तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित पाटलांनी संजयकाका पाटलांना जोरदार दणका दिला आहे. राष्ट्रवादीचे 18 पैकी 14 उमेदवार विजयी झाले आहेत. संजयकाका गटाला अवघ्या 4 जागा मिळाल्या आहेत. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीनं आपली सत्ता राखलीय. इथं आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. 


भंडाऱ्यात काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात नाना पटोले यशस्वी


काँग्रेसने भंडारा जिल्ह्यातील 2 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सत्ता काबीज केली. पवनी, लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यशस्वी ठरले. विशेष म्हणजे भंडा-यात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट यांची युती होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसने एकाकी ही निवणूक लढवत होती. अशा परिस्थितीत नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं स्वबळावर दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता काबीज केली. 


बच्चू कडू यांचा दणदणीत विजय


चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांचा दणदणीत विजय झाला आहे.  चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर बच्चू कडू यांची एकहाती सत्ता आली आहे.  चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेना आणि भाजपचा धुव्वा उडाला आहे. बच्चू कडू यांच्या पॅनलचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. 


भाजपच्या मधुकर पिचडांना मोठा दणका


अहमदनगर जिल्ह्यातल्या अकेल्यात भाजपच्या मधुकर पिचडांना मोठा दणका बसला आहे. पिचडांची सत्ता खालसा झाली.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. 18 पैकी 13 जागांवर आघाडीचा विजय झाला आहे.  भाजपच्या मधुकर पिचडांना अवघ्या पाच जागा जिंकता आल्या आहेत.  विधानसभा, साखर कारखान्यानंतर बाजार समीतीतही पिचडांचा पराभव झाला आहे.