रात्री झोपायला विद्यार्थ्यांनी गादी उचलली अन् सापडला मित्राचा मृतदेह; वर्ध्याच्या आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार
Wardha Crime :
मिलींद आंडे, झी मीडिया, वर्धा : वर्ध्याच्या (Wardha Crime) कारंजा तालुक्यातील एका आश्रमशाळेतून (ashram school) धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारंजा तालुक्याती नारा येथील एका आश्रमशाळेत बारा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर आश्रमशाळेत एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आश्रमशाळेत असणाऱ्या गादीखाली या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी (Wardha Police) याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
शिवम सनोज उईके असं बारा वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. शिवम अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील राहणारा होता. शिवमचा संशयास्पद मृतदेह परिस्थितीत मृतदेह सापडल्याने कारंजा परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र शिवमचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवम शेवटचा दिसला होता. मात्र त्यानंतर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास इतर विद्यार्थी झोपण्याची तयारी करत होते. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी देण्यात आलेल्या गाद्या या एकावर एक रचून ठेवण्यात आल्या होत्या. झोपण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या गाद्या काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका गादीखाली शिवमचा मृतदेह विद्यार्थ्यांना सापडला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना याची माहिती दिली. शिक्षकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर या घटनेची माहिती समजताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणाचा कसून तपास करण्यास सांगितले आहे.