राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचा परिणाम
राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता
मुंबई : राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता. आता पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडण्यााच अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. त्यातही महाड, चिपळूनसारख्या शहरांचे महापूरामुळे मोठे नुकसान झाले होते.
तसेच, कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. खान्देश आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुलनेने पाऊस कमी झाला आहे.
आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येत्या 2-4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.