गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ
नाशिक शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणा-या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झालीय.
नाशिक : नाशिक शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणा-या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झालीय.
दिंडोरी, इगतपुरी, नाशिक,त्र्यंबकेश्वर तालुक्यासह धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं गंगापूर धरणातून गोदावरीच्या पात्रता पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी विसर्ग केला जात असून हे सर्व पाणी जायकवाडीमध्ये जातंय.
सकाळपासून पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे हळूहळू पाण्याचा विसर्ग कमी केला जातोय. मात्र, पावसाचा जोर वाढला तर पुन्हा विसर्ग वाढवण्यात येईल. यंदाच्या मोसमात चार ते पाचवेळा गोदावरीला पूर आल्यानं गोदा काठावरील धार्मिक विधी स्थलांतरित करण्यात आलेत. दरम्यान, परतीच्या पावसानं भात आणि भाजीपाला या शेती पिकांचं नुकसान होतंय.
दरम्यान, जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे उघडण्यात आलेत. गोदावरी नदीपात्रात प्रतिसेकंदाला १५ हजार ६९० क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. नाशिक-नगर भागातील पाण्याची आवक वाढल्यानं प्रकल्पाचे दरवाजे दुस-यांदा उघडावे लागलेत. रविवारी संध्याकाळी १० दरवाजे उघडण्यात आले होते आणि ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं. आज पहाटे पुन्हा एकदा धरणाचे दरवाजे उघडावे लागलेत.