औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामधल्या कन्नड तालुक्यातल्या नागद इथल्या गावकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याने चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये तोडफोड करत कार्यालयातील साहित्य रस्त्यावर फेकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागदमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झालीय. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मंगळवारी पाण्यासाठी जाब विचारायला गावकरी ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले. तक्रार घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये कोणतेही पदाधिकारी उपस्थित नसल्याने महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी ग्रामपंचायतमध्ये तोडफोड सुरु केली. एवढंच नाही तर गावकऱ्यांनी सर्व साहित्य रस्त्यावर आणून फेकले. त्यामुळे आता ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे जनतेचा उद्रेक होताना दिसत आहे.


मराठवाड्यात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात येत असलेले टँकर नियमित येत नसल्याचे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे जून महिन्यात चांगला पाऊस पडला तर काही प्रमाणत पाणीप्रश्न मिटू शकतो. अन्यथा, औरंगाबादसह मराठवाड्यातील परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते अशी स्थिती आहे. त्याची एक झलक ग्रामस्थांनी दाखवून दिली आहे.