सांगलीवर पाणी संकट, कृष्णा आणि वारणा नदीवर पाणी उपसाबंदी
धरणातील पाणीसाठा संपत आला आहे.
रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : उन्हाची तीव्रता आणि पाणी उपसा यामुळे कृष्णा पाणलोट क्षेत्रात धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. कोयना धरणात केवळ १०.१५ तर वारणा धरणात २.३० टीएमसी पाणी शिल्लक आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जलसंपदा विभागाने सांगली जिल्ह्यातील उद्योग आणि शेतीच्या पाणीसाठ्यावर 'उपसाबंदी' लागू केली आहे. यापुढे केवळ पिण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी राहणार आहे.
उन्हाची तीव्रता यंदा सर्वाधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान दहा वर्षात पहिल्यांदाच तब्बल ४२ ते ४३ अंशापर्यंत गेले आहे. एकीकडे सातत्याने पाणी उपसा सुरू असताना पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. परिणामी कोयना, वारणा, धोम, कणेर या धरणांतील पाणी वेगाने कमी होत आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच कोयनेत सरासरी ६० टीएमसी पाणी होते, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते ४५ टीएमसी झाले. मे महिन्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांनी ऊस, केळी, सोयाबीन, द्राक्षे, भाजीपाला आणि अन्य पिकांसाठी पाण्याचा प्रचंड उपसा केला.
दुष्काळी भागातील टेंभू, म्हैसाळ, ताकारी योजनेतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २५ टीएमसीवर आला. कोयना धरणातील पाण्याने मे महिन्याच्या अखेरीस तळ गाठला. सध्या धरणात १५.४७ टीएमसी पाणी आहे. यातील उपयुक्त पाणी केवळ दहा पॉईंट पंधरा टीएमसी आहे. तर वारणा धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ २.३ टीएमसी आहे. पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक असल्यामुळे सांगली जिल्ह्यात बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
४ ते ९ जूनपर्यंत कृष्णा नदीवर वाळवा तालुक्यातील बहे बंधारा ते राजापूर बंधाऱ्यापर्यंत दोन्ही बाजूला शेतीच्या पाण्यासाठी उपसाबंदी करण्यात आली आहे. तर १० जून ते १५ जून सिंचन योजना सुरू करण्यास परवानगी आहे. १६ ते २१ जून या कालावधीत पुन्हा उपसाबंदी लागू असेल. त्यानंतरही पाऊस पडला नाही तर सिंचन योजनांचे पाणी कायमचे बंद केले जाणार आहे. या आदेशाचा भंग केल्यास शिक्षा आणि दंड ठोठावला जाणार आहे.
<