नागपूर : मी गेली ३० वर्ष राजकारणात आहे. लोक ५ वर्ष राजकारण करतात आणि नंतर विसरून जातात. पण, मी राजकारणात असताना जो माझ्याकडे आला त्याला मदत केली. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो हे वक्तव्य आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पटोले यांच्या या वक्त्यव्यावरून वादंग माजला. भाजपकडून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, या प्रतिक्रिया आल्यानंतर पटोले यांनी मी गावगुंड असलेल्या मोदीबाबत बोललो आहे, पंतप्रधान मोदींबाबत नाही असे स्पष्ट केले आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करतात. पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे प्रकरण गाजले. यावेळीही नाना पटोले यांनी काही राज्यांमध्ये चाललेल्या निवडणुकीत स्वतः सहानुभूती मिळविण्यासाठी हा प्रकार केलाय. ठरवून दिलेल्या रस्त्यानं न जाता दुसऱ्या रस्त्याने जायचं आणि वरून आपणच कांगावा करायचा हे पंतप्रधानांना शोभत नाही. त्यांच्या पदाला शोभत नाही'', अशी टीका केली होती. 


या टीकेचे वादळ शमते न शमते तोच नाना पटोले पुन्हा अडचणीत आले आहेत. एका व्हिडीओमध्ये पटोले ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’ असं बोलत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.    


यावर, नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देताना, आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले करत होते. त्यावेळी गाववाल्याना घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. त्यावर ते वाक्य म्हटले आहे. 


पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल ते वाक्य नाही. या प्रकरणाचा बाऊ केला जात आहे. लोकांच्या तक्ररीनंतर मी ते लोकांमध्ये बोललो आहे. कुठल्या भाषणात नाही. यात मी पंतप्रधानांचा किंवा नरेंद्र असा शब्दही वापरला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे, हा प्रकार भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यात याबाबत पटोले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करतील व पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर भाजपा न्यायालयात जाईल, असा इशारा दिला आहे.