Sharad Pawar on Political Heir: शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून एक गट सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत गेला. शरद पवारांनी आता थांबायला हवं, असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. 'पण थांबतील ते पवार कसले?' त्यांनी पुन्हा राज्यातील जनतेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो. शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या काळात देखील त्यांना हा प्रश्न विचारला जायचा. राजकीय वारसदार म्हणून मुलगा हवा, अशी इच्छा खेड्यापाड्यातील जनता शरद पवार यांच्याकडे व्यक्त करायची. यासंदर्भात पवार साहेबांना विचारलेल्या प्रश्नाचे त्यांनी दिलखुलास उत्तर दिले होते. हे उत्तर आजच्या काळातही मुलाचा हव्यास ठेवणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या राजकीय वारसदार कोणीतरी पाहिजे. बर-वाईट झालं तर अग्नी द्यायला मुलगा हवा. मुलाने अग्नी दिला तरच स्वर्गाचा दरवाजा खुला होतो, असे खेड्यापाड्यातील लोकं म्हणत असतं. पण शरद पवारांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली, जी आजही जशीच्या तशी लागू होते.  


ते म्हणतात, यामध्ये प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. मला असं वाटतं की, अग्नी देण्यासाठी कोणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची की जिवतंपणी नीट वागणाऱ्याची चिंता करायची? मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा भारतीय समाज व्यवस्थेचा दृष्टीकोन आहे तोच मुळी टाकून दिला पाहिजे. आपण मुलींनासुद्धा मुलांप्रमाणे वाढवून त्यांना समान संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो. तिच्याकडून उत्तम काम करुन घेऊ शकतो. तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो, याची खात्री मला आहे. स्त्रीला संधी मिळाली तरी ती तिचं कर्तुत्व दाखवू शकते, असेही ते पुढे म्हणाले.


'आम्ही सतत राज्याला, देशाला, जगाला कुटुंब नियोजनासाठी मार्गदर्शन करत बसणार आणि स्वत:च्या घरात भरपूर गर्दी योग्य नाही. आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मुलीवर समाधान मानण्याचा निर्णय मी आणि माझ्या पत्नीने घेतल्याचे', शरद पवार यांनी सांगितले होते.


यानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. 'मुलगी आहे म्हणून मला कधी दु:ख झालं नाही. मुलगा नाही म्हणून कधी शंकाही आली नाही. तेव्हा कॉंग्रेस पक्षानेच बर्थ कंट्रोलचा निर्णय घेतला होता. आमचे कुटुंब फार मोठे होते. त्यामुळे कुणीतरी कुठेतरी निर्णय घ्यायला हवा' असे आम्ही ठरविल्याचे प्रतिभा पवार म्हणाल्या. 


खासदार सुप्रीया सुळे आपले वडील शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या आहेत. शरद पवारांच्या व्यस्त वेळापत्रकात त्यांच्या तब्येतीची काळजी त्या घेत असतात. पवारांच्या 83 व्या वर्षी जवळच्या नेत्यांची साथ सुटणे हे अनाकलनीय होते. अशावेळी पवार साहेबांबद्दल बोलताना त्या भावूकही होतात. पण संघर्षाचा वारसा त्यांना मिळालाय. त्यामुळे स्वत:सोबत कार्यकर्त्यांनाही त्या स्फुर्ती देत असतात. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पडझडीच्या काळातही बाप-लेकीची जोडी राजकारणाचा नवा अध्याय जगासमोर आणेल, असा विश्वास जनतेच्या मनात आहे. 


मुलगी नको, मुलगा हवा, अशी संकुचित मानसिकता ठेवणाऱ्यांसाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.