Maharastra Politics : `...तर पवारांची औलाद सांगणार नाही`, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?
Ajit Pawar On Nitin Patil : महायुतीचे उमेदवार असलेल्या उदयनराजे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली अन् भाषणात बोलताना मोठी घोषणा केली. नेमकं काय म्हणाले अजितदादा?
Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आमनेसामने आहेत. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत कमालीचा जोर लावल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कॉलर उडवलीये. तर दुसरीकडं अजितदादांनी उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. त्यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं अन् कमळाचं काम करा, अशा सुचना उदयनराजेंना दिल्या आहेत. त्याचबरोबर उदयनराजेंना खासदार करायचंय, त्यामुळं जोमानं काम करा, असं आवाहन देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली अन् राज्यसभेवर कोण जाणार? याचं नावच जाहीर केलं.
काय म्हणाले अजित पवार?
सातारा आणि जावळीमधून शिवेंद्रराजे यांनी एक लाखांचं लीड दिलं पाहिजे. पाटणमध्ये देखील चांगलं लीड मिळालं पाहिजे. काहीही करून ही निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे. पायाला भिंगरी बांधा आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कमी पडू देवू नका, असं अजित पवार यांनी म्हटलंय. उदयनराजे भोसलेंना वाई, महाबळेश्वर आणि खंडाळ्यातून लाख मतांचं लीड द्या. ज्यांचं आपल्याशी जमत नाही तेही कमळाचं काम करतात, असं म्हणत अजित पवारांनी सुचक वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एक आश्वासन देखील दिलंय. तुम्ही काळजी करून नका, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून आणा. तुम्ही माझं काम करून दाखवा. मी जूनमध्ये नितीन काकाला खासदार करतो, असं केलं नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
अनेक निवडणुकांमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणारे नितीन पाटील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून तिकीटासाठी आग्रही होते. मात्र, साताऱ्याची जागा भाजपकडे गेल्याने नाईलाजाने नितीन पाटील यांना माघार घ्यावी लागली. उदयनराजेंच्या राज्यसभेच्या जागेवर आता नितीन पाटील यांचा फिक्स नंबर लागणार, अशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. आता साताऱ्याच्या जागेच्या मोबदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभा मिळणार हे अजित पवारांच्या वक्तव्याने जवळजवळ निश्चित झालंय.
दरम्यान, शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पवारांची पाटणमध्ये जाहीर सभा झाली. या वेळी शरद पवारांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. शरद पवारांचे भाषण संपल्यानंतर लोकांमधून एकच जल्लोष केला. त्यातील काहींनी पवारांकडे कॉलर उडवण्याचा आग्रह धरला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पवारांनीही उत्स्फूर्तपणे कॉलर उडवल्याचं पहायला मिळालं.