Cyclone Mocha : आजचा दिवस चक्रिवादळाचा, महाराष्ट्रात पाऊस
Maharashtra Weather Forecast Today : हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच सतर्क. पाहा वादळ कुठे सुरु होऊन कोणत्या रोखानं प्रवास करणार. या परिस्थितीचा तुमच्या भागातील हवामानावर नेमका काय परिणाम होणार...
Maharashtra Weather News : रविवारी महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्याचं पाहायला मिळालं. सातत्यानं बदलणाऱ्या या हवामानामध्ये काही प्रदेशांना उन्हाचा तडाखाही सहन करावा लागला. आठवड्याच्या शेवटही पावसाच्याच सावटानं गेलेला असताना किमान नव्या आठवड्याची सुरुवात तरी हवामानाच्या दृष्टीनं चांगली असावी अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. पण, तसं काहीच झालं नाही. कारण, 8 मे 2023 अर्थात सोमवारपासून पुढील पाच दिवसांसाठी देशभरातील हवामानावर 'मोका' (Cyclone Mocha) या चक्रिवादळाचं सावट असणार आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिवादळसदृश परिस्थिती तयार होत असून, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 9 मे पर्यंत वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चक्रिवादळाचा प्रवास बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे होणार असून, त्यामुळं 8 ते 12 मे या काळात मुसळधार ते अतीमुसळधार पर्जन्यामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वादळाचा हा इशारा पाहता समुद्र खवळलेला असेल, परिणामी मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. एकंदर परिस्थिती पाहता सध्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही बऱ्याच सतर्क असल्याचं स्पष्ट होत आहे.
हेसुद्धा वाचा : Kerala मध्ये नाव उलटून 21 प्रवाशांचा मृत्यू; घटनास्थळाचा पहिलाच Video समोर
महाराष्ट्रावर चक्रिवादळाचे काय परिणाम?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या परिस्थितीचे थेट परिणाम राज्यातील किनारपट्टी भागांवर होणार असून, या भागांना 11 मे पर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय परिणामस्वरुप मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही वादळी पावसाची हजेरी या काळात दिसू शकते असं सांगण्यात आलं आहे. मुंबईमध्ये येते काही दिवस, वातावरण ढगाळ असलं तरीही आर्द्रतेमुळं उकाडा हैराण करताना दिसणार आहे. शहराचत्या काही भागांत रिमझिम पावसाची हजेरीही पाहायला मिळू शकते.
पाहा पुढील 24 तासांत कसं असेल देशातील हवामान
गेल्या 24 तासांचा आढावा घ्यायचा झाल्यास देशातील अती उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. तर, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळच्या किनारपट्टी भागाला पावसानं भिजवलं. सोबतच देशातील मध्य आणि पूर्व भागामध्ये काही अंशी तापमानवाढीची नोंद करण्यात आली.
मागील 24 तासांच्या तुलनेच येत्या 24 तासांमध्ये तापमान नेमकं कसं असेल याबाबतचा अंदाज वर्तवत स्कायमेटनं लडाख, काश्मीरचं खोरं, हिमाचलता पर्वतीय भाग आणि उत्तराखंडच्या काही भागात हिमवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांत पावासाची हजेरी असेल. पुढील दोन दिवस देशातील बराच भाग काळ्या ढगांच्या सावटाखाली असेल असाही इशारा हवामान विभागानं दिला आहे.