Maharashtra Rain News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असेल. महिन्याच्या सुरुवातीलाच या अंदाजानुसार परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोकण आणि विदर्भातील काही भाग वगळला असता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं दडी मारली आहे. अर्थात काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तर, अद्याप पावसानं अपेक्षित हजेरी लावली नसल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर, जिथं शेतीची कामं सुरु करत भातलावणीही पूर्ण झाली, त्या भागांमध्ये पावसानं उसंत घेतल्यामुळं बळीराजाची चिंता वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील दोन ते तीन दिवसांसाठी हवामानाचा अंदाज पाहिल्यास मुंबईमध्ये वातावरण ढगाळ असेल. तर, पावसाच्या तुरळक सरी अधुनमधून बरसणार आहेत. तिथं नवी मुंबईत पाऊस काहीसा जोर धरेल पण, पश्चिम उपनगांमध्येही हलक्या सरींची शक्यता आहे. पण, कुठंही तो मुसळधार बरसणार नसल्याचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, साताऱ्यातील काही भागात ढगाळ वातावरण असेल, घाटमाथ्यावर मात्र पावसाचं प्रमाण तुलनेनं जास्त असून इथं तापमानातही काहीशी घट नोंदवली जाईल. 


हेसुद्धा वाचा : BEST च्या कंत्राटी कर्मचारी संपाचा फटका मुंबईकरांना; काय आहेत त्यांच्या मागण्या? 


 


पुण्यातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळेल. जिथं धरण परिसरामध्ये पाऊस नसला तरीही घाटमाथ्यावर मात्र समाधारकारक पर्जन्यमानामानामुळं मोठा दिलासा असेल. कोल्हापुरातील काही भागात पावसाची उघडीप तर, काही भागांमध्ये मुसळधार सरी बरसणार आहेत. 




पावसाळी सहलीला जाणाऱ्यांची बोंब... 


राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळं पावसाळी सहलीला निघणाऱ्यांचे बेत काहीसे फसले आहेत. बऱ्याच धबधब्यांचे प्रवाह संथ झाले आहेत. तर, काही भागांमध्ये सूर्यकिरणांची झळाळी पाहायला मिळत आहे. पावसात चिंब भिजण्याची इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकली नाही, तरीही निसर्गाला आलेला बहर मात्र तुमच्या मनाचा ठाव घेणार आहे. त्यामुळं चिंब भिजण्यासाठीच्या ठिकाणी जाण्याऐवजी एखाद्या निसर्गसौदर्यानं नटलेल्या ठिकाणाला भेट द्यायलाच प्राधान्य द्या. 


देशभरात पावसाची काय परिस्थिती? 


इथं महाराष्ट्रात पावसानं उसंत घेतलेली असतानाच तिथं देशाच्या काही भागांमध्येसुद्धा अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश, ओडिशापासून हिमाचलपर्यंत पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. अद्यापही हिमाचलमध्ये पावसामुळं मोठी हानी होत असून, महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प आहे.