दाढ काढल्यानंतर महिलेचा मृत्यू, एका दाढेनं घेतला जीव?
दाढ काढणं पंढरपुरातील एका महिलेच्या जीवावर बेतलंय.
अमर काणेसह सचिन कसबे, झी २४ तास : केसानं गळा कापला, अशी एक म्हण आहे. मात्र एका दाढेनं जीव घेतल्याचं कदाचित तुम्ही ऐकलं नसेल. मात्र दाढ काढणं पंढरपुरातील एका महिलेच्या जीवावर बेतलंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात. (westran maharashtra pandharpur jayshree chavan dies after tooth treatment)
ही धक्कादायक घटना आहे पंढरपुरातील. शिरढोणमधील 25 वर्षीय महिला जयश्री चव्हाण पंढरपूरच्या दातांच्या दवाखान्यात उपचार घेत होत्या. दाढदुखी थांबत नसल्यामुळे अखेर डॉक्टरांनी दाढ काढली. मात्र त्यानंतर दाढेतून रक्तस्त्राव थांबत नव्हता. डेंटिस्टनं त्यांना गोळी दिली. त्याचाही फायदा झाला नाही.
जयश्री यांना उटली झाली. अखेर आधी एका खासगी रुग्णालयात आणि तिथून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डेंटिस्टच्या हलगर्जीपणामुळे जयश्री यांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप त्यांच्या नातलगांनी केलाय. असं असलं तरी तज्ज्ञांनी यात वेगळीच शक्यता बोलून दाखवलीये. डेंटिस्टला मेडिकल हिस्ट्री नीट सांगितली नाही, तर कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते.
महिलेचा पोस्ट मॉर्टेम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजणार आहे. मात्र या घटनेमुळे एखादा छोटासा उपचार घेतानाही किती सावधगिरी बाळगली पाहिजे, हे स्पष्ट झालंय. उपचार दाढेवर होत असले, तरी आपल्या आरोग्यबाबत बारीक-सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.