ऋचा वझे झी 24 तास मुंबई : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लहान मुलांनाही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला देशभरात सुरूवात होणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेसह राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्यात. नेमकी कशी सुरू आहे तयारी आणि लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. 



याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसह राज्यातील आरोग्य यंत्रणेनं तयारी सुरू केली. मुंबईत 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांची संख्या 9 लाख असून 9 जम्बो कोरोना केंद्रात त्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली.


कशी करायची नोंदणी?


- लसीकरणासाठी कशी कराल नोंदणी? 
- सर्व प्रथम Covin App वर जाऊन लॉग इन करा
- मुलाचं नाव, जेंडर आणि जन्मतारीख निवडा
- तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
- आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा
- लसीकरण केंद्रावर जाऊन संदर्भ आयडी, सीक्रेट कोड सांगा आणि लस घ्या


महत्वाचं म्हणजे ज्या मुलांकडे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसेल तर त्यांचं दहावीचं ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. इतकच नाही तर ऑनलाईन नोंदणीशिवाय वॉक इन नोंदणीचा पर्यायही देण्यात आला आहे. तर मग वाट कसली पाहता? कोरोविरोधातल्या लढाईचा भाग म्हणून प्रत्येक किशोरवयीन मुलानं लस घ्यायलाच हवी.