मुंबई : कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारडून राज्याला तुटपुंजी मदत येत असल्याचा आरोप राज्यातल्या महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी केला आहे. महाविकासआघाडीच्या या आरोपांना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती मदत दिली, याची आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारने रेशन म्हणजेच प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेच्या माध्यमातून १,७५० कोटी रुपयांचे गहू, २,६२० कोटी रुपयांचे तांदूळ, १०० कोटी रुपयांची डाळ आणि स्थलांतरित मजुरांसाठी १२२ कोटी असं एकूण ४,५९२ कोटी रुपयांचं धान्य दिल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. 



प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून राज्याला १,७२६ कोटी रुपये, जनधन योजनेतून १,९५८ कोटी रुपये, विधवा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ११६ कोटी रुपये असे एकूण ३,८०० कोटी रुपये तसंच उज्वला योजनेतून ७३ लाख १६ हजार गॅस सिलेंडर दिल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. 



केंद्र सरकारने राज्याकडून ५,६४७ कोटी रुपयांचा कापूस, २३११ कोटी रुपयांचं धान, ५९३ कोटी रुपयांची तूर, १२५ कोटी रुपयांचा चणा आणि मका तसंच पीकविम्याचे ४०३ कोटी असे एकूण ९,०७९ कोटी रुपये खर्च केल्याचे आकडे फडणवीस यांनी दिले..



स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी ६०० रेल्वेगाड्यांसाठी ३०० कोटी रुपये दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. याचसोबत राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठी १,६११ कोटी रुपयांची मदत, आरोग्यासाठी ४४८ कोटी रुपयांची मदत असे एकूण २,०५९ कोटी राज्याला दिले, तसंच डिव्हॅल्यूएशन ऑफ टॅक्सच्या माध्यमातून राज्याला ५,६४८ कोटी रुपयांची मदत झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. 




केंद्र सरकारने महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरिक्विनच्या ४७ लाख २० हजार गोळ्या दिल्या. ४१ शासकिय आणि ३१ खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली. तसंच ९.८८ लाख पीपीई किट्स, १५.५९ लाख एन-९५ मास्क देण्यात आले. केंद्राने राज्याला ४६८ कोटी रुपयांची आरोग्यासाठी मदत केली, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.