Chhagan Bhujbal : शाळेत सरस्वती पूजेची गरज (Saraswati Pooja) काय? पूजा करायची तर छत्रपती शिवाजी महाराजांची (chhatrapati shivaji maharaj) करा अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. अखिल भारतीय समता परिषदेच्या महात्मा फुले स्मृती दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीने किती शाळा काढल्या असा सवालही केला. त्यामुळे शाळेत, महाविद्यालयांमध्ये सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमा लावा असेही भुजबळ म्हणालेत. याआधी एका कार्यक्रमात बोलताना शाळांमधील सरस्वती पूजा बंद करा आणि महापुरुषांची पूजा करा, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील झाली होती. आता पुन्हा एकदा देवी सरस्वती बाबत वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले छगन भुजबळ?


"शाळांमध्ये सरस्वतीच्या पूजेची गरज काय? पूजा करायची तर राज्यक्रांती घडवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची करा. सरस्वती कुठून आल्या? किती शाळा त्यांनी काढल्या? किती लोकांना शिकवलं? डिग्री डिप्लोमा काय दिलं? आणि त्यांनी दिलं तर महात्मा फुलेंना हे का मिळालं नाही? जर त्यांनी केलं तर मग सगळ्यांना शिक्षण का मिळालं नाही? ब्राम्हण पुरुषांना फक्त शिक्षण मिळालं. आपण ब्राम्हणांच्या नाही तर ब्राम्हण्यवादाच्या विरोधात आहोत," असे छगन भुजबळ म्हणाले.


याधीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद


छगन भुजबळ यांनी याआधीही सरस्वतीबाबत वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद पेटला होता. "शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. पण सरस्वतीचा फोटो लावतात. सरस्वतीला आम्ही कधी पाहिलं नाही. आम्हाला काही शिकवलं नाही.  शिकवलं असेलच तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं. त्यांची पूजा कशासाठी करायची?"असे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते.