कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : अति सोनं घालाल तर यमराज बोलवाल. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातल्या गोल्डमेनची चांगलीच चर्चा आहे. मनसे आमदार रमेश वांजळेंचा कित्ता अनेक जण गिरवतायत. मात्र सोन्याचं हे प्रदर्शन जीवावर बेततंय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातल्या 'गोल्डमेन'च्या मृत्यूचं गूढ अजून कायम आहे? सोन्याचं असलं प्रदर्शन जीवावर बेततंय ? गोल्डमॅन आणि मृत्यूचं काय आहे नातं ? जाणून घेऊया स्पेशल रिपोर्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे आणि गोल्डमॅन हे जुनं समीकरण आहे. याची सुरूवात झाली ती मनसे आमदार रमेश वांजळे यांच्यापासून.  अंगावर भरपूर दागिने घालणारे वांजळे थेट एखाद्या साऊथ फिल्ममध्ये शोभतील असे दिसत. त्यांच्या या लुकमुळे त्यांना अतोनात प्रसिद्धी मिळाली आणि पुण्यात गोल्डमॅनचं पेवच फुटलं. वांजळेंनंतर चर्चा झाली ती दत्ता फुगे यांच्या गोल्ड शर्टची. पिंपरी-चिंचवडच्या फुगे यांनी 3 किलो 600 ग्रॅमचा दीड कोटींपेक्षा महाद असलेला सोन्याचा शर्ट बनवला होता. पण सोन्याचं हे असं प्रदर्शन आणि अकाली मृत्यू यांचं काही नातं आहे का ? कारण पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अशा 4 घटना घडल्या आहेत. 



रमेश वांजळे लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मृत्यू झाला.  10 जून २०११ रोजी ४६ वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा अंत झाला. तसेच सोन्याचा शर्ट घालणारे दत्ता फुगे यांची 14 जुलै 2016 रोजी वयाच्या 47व्या वर्षी हत्या झाली. अंगावर १०-१२ किलो सोनं घालणारे पुण्याचे गोल्डमॅन सम्राट वझे यांचा गेल्यावर्षी ७ मे रोजी ३४ वर्षी मृत्यू झाला.  तर आता सचिन शिंदे या गोल्डमॅनची २९व्या वर्षी हत्या झाली आहे.


सोन्याचं असं प्रदर्शन टाळण्याचा सल्ला पोलीस देतायत, तर प्रस्थापित राजकारणी मंडळी या गोल्डमेनपासून चार हात दूर राहणंच पसंत करत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याची गाडी, सोन्याचं मोबाईल कव्हर अन् अंगावर दागिने घालणारा विकी वाघचौरे फेमस आहे. राजकारणात शिरण्याचा प्रयत्न करणारा राहुल रास्तेही शहरात गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहे. यांची कॉपी अनेकजण करतायत... मात्र अशी लोकप्रीयता खरोखर उपयोगाची आहे का, असा प्रश्न आहे.