पालघर : आधी उमेदवारांची पळवापळवी... मग पैसेवाटपासाठी गेलेल्यांना रंगेहाथ पकडण्याचं नाट्य... आणि आता मुख्यमंत्र्यांची कथित आक्षेपार्ह व्हिडिओ क्लीप... पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं प्रचारानं किती हीन पातळी गाठली, ते दिसून येतंय. साम... दाम... दंड... भेद... काहीही करून पालघरची पोटनिवडणूक जिंकायचीच, असा पण सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं केलाय... त्याचीच प्रचिती प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत पाहायला मिळाली... पोटनिवडणुकीसाठी वातावरण तापलेलं असताना मतदारांना भुलवण्यासाठी पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार शिवसेनेनं उजेडात आणला... भाजपच्या वतीनं पैसेवाटपासाठी आलेल्या १३ जणांना शिवसेनेच्या नेत्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं... एवढंच नव्हे तर भाजपच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्याची जोरदार मागणी शिवसेनेनं केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, पैसे वाटप करणारे भाजपचे कार्यकर्ते नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला... तसं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपवरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत. 


'ऑडिओ क्लीप'चं राजकारण


हे कमी झालं म्हणून की काय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची आक्षेपार्ह ऑडिओ क्लीप जाहीर सभेत ऐकून दाखवली... साम, दाम, दंड, भेद यापैकी कोणत्याही मार्गाचा वापर करा, पण निवडणूक जिंकाच, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लीपमध्ये भाजप कार्यकर्त्यांना केलंय... त्यामुळं एकच खळबळ उडाली.


मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण


यावर, ऑडिओ क्लीपमधला आवाज आपलाच असल्याची कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मात्र शिवसेनेनं मागचा-पुढचा आवाज काढून टाकून अर्धवट ऑडिओ क्लीप ऐकवली. साम, दाम, दंड, भेद म्हणजे कूटनीतीचा वापर, अशी सारवासारव देखील मुख्यमंत्र्यांनी केली... तर सभ्य मुख्यमंत्र्यांच्या तोंडी दादागिरीची भाषा का? असा सवाल करतानाच क्लीपमध्ये मोडतोड केली नसेल तर मुख्यमंत्री राजीनामा देणार का? असं आव्हान शिवसेनेनं दिलंय.


दरम्यान, शिवसेना-भाजपमध्ये गँगवॉर सुरू असून, निवडणूक आयोगानं याबाबत योग्य कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. पालघर पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात. पण यानिमित्तानं सत्ताधारी भाजप-शिवसेनेतले संबंध आणखी कडवट झाल्याचं चित्र दिसतंय. पोटनिवडणूक निकालानंतर सत्ताधारी मित्रपक्षांमधलं हे वितुष्ट आणखी वाढणार, एवढं नक्की...