प्रशांत परदेशी, धुळे : देश स्वतंत्र झाला तेव्हापासून धुळे जिल्ह्यात एकही इंच नवीन रेल्वेमार्गाचे काम झालेले नाही. उत्तर महाराष्ट्रासाठी भाग्य विधाता ठरणाऱ्या मनमाड - धुळे - इंदोर या रेल्वे मार्गाची मागणी गेली अनेक दशकांपासून केली जात आहे, मात्र या मार्गाबाबत जितके राजकारण झाले ते अन्य कुठेही झाले नसेल. नुकताच अर्थसंकल्प सादर झाला यात या मार्गासाठी भरीव तरतूद केल्याचा दावा खासदारांनी केला आहे. तर विरोधकांनी या दाव्याची खिल्ली उडवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाड - मालेगाव - धुळे - इंदोर या ३६५ किलोमीटर अंतर असलेला नवीन रेल्वेमार्ग व्हावा यासाठी १९९०च्या आधीपासून संघर्ष सुरु आहे. हा रेल्वे मार्ग किमान तीन कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दुवा हा मार्ग ठरू शकतो. मात्र अद्यापही या मार्गाबाबत ठोस दावा कोणीही करू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोरविहीर ते नरडाणा या मार्गाचे भूमिपूजन केले. त्याबाबत प्रक्रियाही सुरु झाली मात्र. संपूर्ण ३६५ किलोमीटरचा मार्ग केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट नाही. 


नुकताच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या मार्गासाठी भरीव तरतूद केल्याचा दावा खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केला, तर त्यांच्या या दाव्याला माजी आमदार अनिल गोटे यांनी आव्हान दिले आहे. गोटेंनी केंद्र सरकारची खिल्ली उडवत या मार्गाबाबत सरकारच्या उदासीनतेवर टीका केली आहे. सामान्य धुळेकर मात्र हा मार्ग लवकर झाला पाहिजे याबाबत आशावादी आहेत. मात्र या रेल्व मार्गावर सुरु असलेलं राजकारण धुळेकरांना वीट आणणारे आहे.


या संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण करावं जेणेकरुन या भागाला लागलेला मागासपणाचा शाप दूर होईल अशी अपेक्षा खान्देशवासीय करत आहेत.