डोंबिवली : कावळा म्हटलं की काळा रंग हे गणित ठरलेलं आहे. पण कावळा सफेदही असतो, असं कुणी म्हटलं तर साहजिकच यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण चक्क पांढऱ्या रंगाचा (white crow) कावळा डोंबिवलीत दिसून आला आहे. डोंबिवलीतल्या पेंडसे नगरमध्ये राहणारे हितेश शहा यांच्या नजरेस हा पांढरा कावळा पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हितेश शहा यांच्या घराजवळ येणाऱ्या पक्षांमध्ये एक वेगळाच पक्षी असल्याचं आज आढळलं. कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केलं, तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण, चोच आणि डोळे हे कावळ्या सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली आणि त्याचा रंग होता चक्क पांढरा.


हितेश शहा यांनी प्लांट अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) संस्थेला फोन करत प्राणी मित्र निलेश भणगे यांना बोलावून घेतलं. निलेश यांनी तात्काळ पेंडसे नगरला जाऊन बाकी काळ्या कावळ्यांच्या मारातून या पांढऱ्या कावळ्याला वाचवलं. पांढऱ्या कावळ्याला मुरबाड इथल्या त्यांच्या संस्थेच्या हॉस्पिटलला निगराणी खाली ठेवलं असल्याचं निलेश भणगे यांनी सांगितलं.


अशा प्रकारचा पांढरा कावळा क्वचितच आढळतो. खरंतर, पांढरा कावळा ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे. पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंगद्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी - जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते, असे भणगे यांनी सांगितलं