पुणे :  सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण याबाबतचा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा होत आहे. पुणे महापालिकेनं त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी त्याचा शुभारंभ होत असतानाच, पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळानं त्याविरोधात मंडई चौकात आंदोलन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आद्य क्रांतिकारक भाऊ रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असून, त्यांनी १८९२ मध्ये पहिला सार्वजनिक गणपती बसवल्याचं भाऊ रंगारी गणेश मंडळाचा दावा आहे. तर लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणोशोत्सवाचे प्रसारक असल्याचंही मंडळानं म्हंटलंय. त्यामुळे यंदांचं वर्ष हे सार्वजनिक गणेशोत्सवाचं १२५ वं वर्ष नसून १२६ वं वर्ष असल्याचंही, भाऊ रंगारी गणेश मंडळानं सांगितलंय.


 या वादावर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भाऊ रंगारी गणेश मंडळ आपल्या भूमिकेवर ठाम असून, शनिवारवाड्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारलेला सत्कारही त्यांनी महापालिकेला परत केला. आता भाऊ रंगारी गणेश मंडळ आज एक पत्रकार परिषद घेणार असून, राजकीय नेते या विषयावर कशा प्रकारे दुटप्पी भूमिका घेतात याचा खुलासा मंडळाकडून पुराव्यासहित करण्यात येणार आहे.