अहमदनगर : राहता तालुक्यातील खंडोबाच्या वाकडीत आज शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. गावातील चौकात दोन तास जागरण-गोंधळ घालून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय. शेतकऱ्यांचा संप 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणतांबा येथील किसान क्रांति संघटनेचे सदस्य आणि मुख्यमंत्री यांच्यात वर्षा बंगल्यावर झालेली चर्चा ही केवळ वेळकाढूपणा असल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी म्हटलंय. काही ठराविक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या संपाला पाठिंबा देणाऱ्या इतर ३८ पेक्षा जास्त संघटनांना विचार न घेताच परस्पर 'संप मागे घेतल्याचा' निर्णय जाहीर केला... हा या शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचं त्यांनी म्हटलंय. 


शिवाय, या चर्चेदरम्यान शासनाचे कुठलेही सचिव अधिकाऱ्यांची उपस्थितीदेखील नव्हती... शेतकऱ्यांना कुठलंही लेखी आश्वासन देण्यात आलेलं नाही... जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि तसं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत शेतकरी संप सुरुच ठेवणार असल्याचं वाकडी येथील शेतकऱ्यांनी म्हटलंय.