शिवसेनेच्या मंत्र्यांना अजित पवारांची अॅलर्जी? अजितदादा आणि शिवसेनेत दुरावा?
भरत गोगावलेंच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तसबिरी भिंतीवर होत्या. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची तसबीर मात्र तिथं नव्हती.
महायुतीतले पक्के दोस्त शिवसेना आणि राष्ट्रवादीतले राजकीय संबंध फारसे सुमधूर राहिले नाहीत. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी आज मंत्रालयातल्या दालनातून कामकाज सुरु केलं. त्यांच्या दालनात फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचे फोटो होते. पण अजित पवारांचा फोटो मात्र दिसत नव्हता. अजित पवार शिवसेनेला रुचत नाहीत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
गोगावलेंच्या दालनात अजितदादांचा फोटो नाही
शिवसेनेच्या मंत्र्यांना अजितदादांची अॅलर्जी?
अजितदादा आणि शिवसेनेत दुरावा?
रोजगार हमी मंत्री भर गोगावलेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. श्रद्धाळू असलेल्या गोगावलेंनी दालनात गणेशपूजन केलं. यावेळी सगळ्यांनाच एक गोष्ट प्रकर्षानं खटकली. गोगावलेंच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तसबिरी भिंतीवर होत्या. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची तसबीर मात्र तिथं नव्हती.
विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाटतं तेवढं सख्य राहिलेलं नाही. अजित पवारांनी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपवल्याचा आरोप नेहमीच होत राहिला आहे. आता मंत्रिपद वाटपातही अजितदादांमुळे शिवसेनेला महत्वाची खाती मिळाली नाही अशी शिवसेनेत भावना आहे. त्यातच आज भरत गोगावलेंनी अजित पवारांचा फोटो दालनात लावलेला दिसला नाही. ही बाब माध्यमांच्या नजरेतून सुटली नाही. यावर गोगावलेंना विचारलं असता त्यांनी गोलमोल उत्तरं दिली.
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना शिवसेना नेत्यांनी अजितदादांवर अडवणुकीचा आरोप केला होता. त्यावेळी अर्थमंत्रिपद अजितदादांकडं होतं आताही त्यांच्याकडंच अर्थमंत्रिपद आहे. गेल्या सरकारमध्येही अजित पवारांविरोधात गुलाबराव पाटलांनी आघाडी उघडली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांच्या दालनात अजित पवारांचा फोटो नकोसा वाटू लागलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय. अजित पवारांबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये राग आहे का अशी चर्चा या निमित्तानं सुरु झालीये.