ठाणे : २०१९ ला विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. राज्याला उद्धव ठाकरे यांच्या रूपात महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री मिळाला. असे असतानाही ठाण्यात झळकाविण्यात आलेल्या त्या बॅनर्सची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजफ्याचे नगरविकास मंत्री आणि सध्याचे शिवसेनेतील हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडसह सर्व ठाण्यात पोस्टर्स, बॅनर्स झळकाविण्यात आले आहेत. या बॅनर्समध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे.


एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनर्सची चर्चा आता राज्यात होऊ लागली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार बनविण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक चर्चेत होते. 


मात्र, शिंदे यांना महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचे नाव मागे पडले. अखेर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे येऊन ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. इतकेच नव्हे तर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनाही थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. 


त्यावेळी एकनाथ शिंदे यांची ही संधी हुकली असली तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी पोस्टरबाजी करत त्यांना मनातल्या मुख्यमंत्रीपदाचे स्थान दिलंय. शिंदे यांची संधी हुकल्यानंतर आता संधी मिळाल्यास तेच मुख्यमंत्री होतील अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्याच भावनेतून त्यांनी हे बॅनर्स झळकावले असले तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असे पोस्टर्स, बॅनर्स झळकावणे कितपत योग्य आहे असा सवाल करण्यात येत आहे.