कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे. शिवसेनेला पूर्णपणे संपविण्याचा डाव चालू आहे. त्यात तुम्ही फसत चालला आहात. त्याची आधी चिंता करा, असा सूचक इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचा काल मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादीचे सिद्दार्थ कांबळे मुंबै बँकच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, उपाध्यक्षपदी लढणारे शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेला संपविण्याचा हा डाव आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कसा पडला हे त्या पक्षाला समजत नाही, असे पाटील म्हणाले.

कोल्हापूर येथे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका केली. नशिबाने काल परवा प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या संजय राउतांसारख्या नेत्याने आमच्या दृष्टीची चिंता करू नये. ती तपासायला भाजपाचे नेतृत्व समर्थ आहे. पण, तुमची दृष्टी कमकुवत झाली का? उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुमचा उमेदवार कसा पडला हे दिसले नाही का? असा टोला लगावला.

महाराष्ट्रातील परिस्थिती देशात चांगली आहे, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला. त्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. गेले ७० दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत. एसटीचा संपात ७० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या.

सरकारी भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. विमा नाही आणि नुकसानभरपाईही नाही, असे असूनही त्यांना तसे वाटत असेल तर ठीक आहे.

राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी मतं लागतात याची गोळाबेरीज करण्याचा राष्ट्रवादीचा फक्त प्रयत्न आहे. पण, शिवसेना असे का करते ते कळत नाही. संजय राऊत यांचं गोव्यात जे काही चाललंय ते भाजपच्या फायद्याचं आहे, असं त्यांनी सांगितलं.  

कोल्हापूर उत्तर विधानसभा लढविण्यावर ठाम
कोल्हापूर उत्तर विधानसभेचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणुक होणार आहे. आमदार जाधव यांच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला होता. पण, जयश्री जाधव यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे ज्याप्रमाणे देवलुर, पंढरपूरची पोटनिवडणुक लढवली त्याप्रमाणे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकही लढवू असे पाटील म्हणाले.