Milind Deora News Today: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे जवळचे शिलेदार समजले जात होते. असं असताना मिलिंद देवरा यांनी राजीनामा का दिला, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुल गांधी आजपासून मणिपूरमधून त्यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू करत असतानाच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलिंद देवरा गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे संयुक्त कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. असं असतानाही देवरा यांनी इतके मोठे पाऊल का उचलले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी दावा केला होता. त्यामुळंच देवरा यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. 


दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2019 व 2014 साली मिलिंद देवरा लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, या दोन्हीवेळाला त्यांना हार पत्करावी लागली. दोन्ही वेळेला भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी मात दिली होती. यंदा एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याचा अंदाज आहे. तर, यंदा लोकसभेसाठी काँग्रेस I.N.D.I.A  युतीचा भाग आहे. त्यामुळं यंदाच्या लोकसभेसाठी उद्धव ठाकरे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अडून बसले आहेत. त्यामुळं काँग्रेस मिलिंद देवरा यांच्यासाठी दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात होती. याच कारणामुळं मिलिंद देवरा नाराज होते. म्हणून देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून दुसऱ्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला. 


मिलिंद देवरा भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होता. मात्र, देवरा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना जोर आला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहे. 


राहुल गांधी यांच्या जवळचे


मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात देवरा कुटुंबांचे महत्त्वाचे योगदान आहे. या परिवारातील सदस्य दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून गेली चार दशक निवडणुक लढवत आहेत. मिलिंद देवरा हे दोन वेळा जिंकले आहेत. त्यांचे वडिल आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा हेदेखील याच मतदारसंघातून चारवेळा निवडणुक जिंकले होते. दक्षिण मुंबई मतदारसंघ देवरा कुटुंबीयांची परंपरागत सीट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपावरुन मिलिंद देवरा नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचे मुळ कारण म्हणजे काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर त्यांची बाजू ठळकपणे मांडली नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 


बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया


आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून  करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुल गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.