सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या फेऱ्यांना का मिळतेय राज्यपालांची नकारघंटा
विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लवकर घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, निवडणुकीच्या त्या प्रस्तावावर अद्याप राज्यपालांनी स्वाक्षरी केली नाहीय.
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा लवकरच सुटेल असे वाटत होते. गेल्या अधिवेशनात राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी गुप्त मतदान घेण्याच्या प्रस्तावावर सही केली नव्हती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल या प्रस्तावावर सही करतील अशी अपेक्षा महाविकास आघाडी सरकारला होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणात सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालत राज्यपालांची नाराजी ओढवून घेतली. त्यामुळे आता राज्यपाल मविआ सरकारच्या या प्रस्तावावर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आघाडी सरकारमधील मंत्री, शिष्टमंडळ यांनी निवडणुकीचे पत्र पाठवले. प्रत्यक्ष दोन वेळा भेटही घेतली. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. परंतु, राजभवनात कोणतीही कार्यवाही झाली नाही.
त्यापाठोपाठ आज मंगळवारीही काँगेसचे महूसल मंत्री बाळासाहेब थोरात आणि परिवहन अनिल परब यांनी सायंकाळी राजभवनात राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली.
महाविकास आघाडी सरकारने ९ मार्चला अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची तयारी केली. मात्र, त्या पत्रावर राज्यपालांनी अद्याप सही न केल्याने सरकारपेक्षा काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम राज्यपालांकडून जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यपाल यांनी सही न केल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला नाही, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
मंत्रिमंडळ फेरबदल...?
येत्या १० मार्चनंतर काँग्रेसचे मंत्री बदलले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यादृष्टीने कोणतीही हालचाल दिसत नाही. मात्र, मंत्रीमंडळ फेरबदलाची शक्यता गृहीत धरून ही निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.